Tuesday, May 8, 2012

संजीवनी बोकील - मुठभर हृदया


पांढरे निशाण उभारण्याची
घाई करू नकोस,
मुठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणार्‍या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा,
तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी.
वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
हे तपासण्यासाठी नव्हे,
आपण काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी..

Sunday, May 6, 2012

ही माझी प्रीत निराळी - ग्रेस


ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतिरंगातील नि:संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी

(शेवटची दोन कडवी आधी नसल्याने पुन्हा एकदा)