Tuesday, January 11, 2011

विंदा करंदीकर - ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.

3 comments:

  1. कविकल्पना रम्य आहे

    ReplyDelete
  2. कविकल्पना रम्य आहे. मला वाटते हिवाळी ऊन खात बसलं असतांना कविराजांना ही कविता सुचली असावी

    ReplyDelete
  3. खुप छान आहे कविता

    ReplyDelete