सावल्यांचे नृत्य
माझ्या चांदण्याच्या अंगणात
घननीळ वेदनांचे
लास्य तुझ्या गायनात !
अबोलीचा गोंड माझा
दिसायला साधाभोळा
पोटी परी गांठ त्याच्या
ठावी माझ्या काळजाला
सुरंगीच्या सुगंधाने
डंख विसरला नाग
रात्र ओथंबली तरी
जाईना का तुझा राग ?
जांभ रंगा आला दारी
तळी गुलालाची रास
माघ मोहरला अंगी
जरा बिलगुनी हांस
- बा. भ. बोरकर
सावल्यांचे नृत्य माझ्या चांदण्याच्या अंगणात
रात्री चांदण्यांच्या प्रकाशात, झाडांच्या सावल्या अंगणात पडल्या आहेत आणि वाऱ्यावर फांद्या हलल्या की अंगणातल्या सावल्या देखील हलताहेत, त्यांचं जणू नृत्य चालू आहे.
घननीळ वेदनांचे
लास्य तुझ्या गायनात
लास्य म्हणजे नृत्य.. तुझ्या गायनात जणू एक नृत्य आहे.
कशाचं लास्य आहे?
घननीळ वेदनांचे
घननीळ वेदना...
सावल्यांचे नृत्य.... म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेल्या सावल्यांचे , चांदण्या म्हणजे त्याची सर्जनशीलता, सावल्या म्हणजे त्याच्या कवी असण्यावर मोहून त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्याच्या प्रेयसी.
त्यामुळे त्याची जी सहचरी आहे तिच्या गायनात घननीळ वेदना आहेत.
ती गाते तर आहेच, संसार तर चालूच आहे.
अबोलीचा गोंड माझा
दिसायला साधाभोळा
पोटी परी गांठ त्याच्या
ठावी माझ्या काळजाला
ही अबोली म्हणजे सहचरी आहे.
दिसायला साधाभोळी, सगळं समजून घेणारी, उमजून असलेली.
अबोलीचं फूल फार दुर्मिळ नाही आणि फार वैशिष्ट्य पूर्ण नाही. त्याच्या देठाला खाली, सुरूवातीला एक फुगवटा असतो, सहज कुणाच्या लक्षात येणार नाही असा.
तसा या अबोली ( अबोल असणारी, याही अर्थाने) च्या पोटातही गाठ आहे, कवीला ते माहित आहे. म्हणून तो बदलला का ? नाही.
सुरंगीच्या सुंगंधाने
डंख विसरला नाग
नागाला सुगंधी वनस्पती आवडतात आणि त्या सुगंधावर भाळून तो त्यांच्या जवळ राहतो. केवडा किंवा चंदनाच्या झाडावर साप असतात.
तसे सुरंगीच्या झाडावर देखील असतात.
डंख करणारा नाग आहे,
त्या वेदनांचं गाणंच तर ती गाते आहे.
सुरंगी फुलली, त्याला कदाचित जुने दिवस आठवले, आपण तिला किती दुखावलं आहे, हे तो विसरला आहे.
तिनेही ती विसरावं अशी त्याची अपेक्षा आहे.
रात्र ओथंबली तरी
जाईना का तुझा राग
ती विसरली नाहीये.
वरवर सगळंच तर छान चाललं आहे.
पोटी परी गांठ तिच्या
रात्र बहरली असेल, तिचा राग जात नाहीये.
जांभ रंगा आला दारी
तळी गुलालाची रास
माघ मोहरला अंगी
जरा बिलगुनी हास
या गुलालाच्या राशीची एखादी सुखद आठवण असेल,
त्याचं स्मरण तो तिला करून देतो आहे.
पण नाही.
ही ना प्रेमाची कविता आहे,
ना विरहाची आहे,
ना आर्जवांची आहे,
ना क्षमायाचनेची आहे,
ना चुकांच्या कबुलीची आहे,
एखाद्या वास्तव कादंबरी सारखी ही कविता आहे.
दोघांमधलं अंतर स्पष्ट दिसतं आहे.
कितीतरी दिवसांनी त्याला काहीतरी वाटलं आहे.... त्यात उत्कटता नाही.
वाटून गेल्याची नुसती नोंद आहे.
एक उदासी पसरली आहे.
जी आपल्याला अस्वस्थ करते.
आपल्याला याचंही पटतं, तिचंही पटतं.
आपण नुसते साक्षीदार.
कवितेची शब्दकळा बोरकरांची, ओळखीची आहे, त्यातली भावना सहसा बोरकरांच्या कवितेत न भेटणारी.
- विद्या कुळकर्णी
- १२ मार्च २५
No comments:
Post a Comment