Friday, February 11, 2011

पद्मा गोळे : जाणीव


अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

--- पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा
समुद्र केव्हा वादळतात;
काळेकुट्ट ढग येतात;
वादळवारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात --
असे... असे बरसतात की
खुजेपणा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !

-- त्या क्षणाच्या आठवणींवर
खुजा जीव जगू पहातो;
क्षणभर थोड उंच होऊन
पाऊल थोडं पुढं टाकतो !

4 comments:

  1. त्या क्षणांच्या आठवणींवर
    खुजा जीव जगू पहातो;
    क्षणभर थोडं उंच होऊन
    पाऊल थोडं पुढं टाकतो!

    ReplyDelete
  2. वा!कविता छानच आहे.

    ReplyDelete