सुरमई
{किरण येले (मौज दिवाळी २०१०)}
तुम्हांला सुरमई माहीत आहे का ?
बरोब्बर!
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?
अरे ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;
तिची चमचमती त्वचा,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.
पण माफ करा,
तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;
तुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,
तुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,
तुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर
तुम्हांला नक्कीच माहीत नाही!
एक सांगतो,
रागावू नका;
तुम्हांला खरं तर
सुरमईची फक्त चव माहीत आहे,
सुरमई नाही.
आणि जे सुरमईच्या बाबतीत
तेच-
अगदी
तेच-
बाईच्याही
अफलातून!!
ReplyDeleteसमजा, सुरमईची सगळी माहीती करून घेतली तरी शेवटी सुरमई ही खाण्याचीच चीज आहे, यावर एकमतच आहे ना?!
ReplyDelete