Thursday, November 25, 2010

सौमित्र - शेवटची निघून जाताना

तू निघून चाललीयेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्या दिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी ट्रॅफिक जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी स्लोमोशन झालीये गर्दी
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
साऱ्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चालताहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात सिग्नल्सवर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत

1 comment:

  1. तू निघून चाललीयेस कायमची हे कळल्यावर

    ReplyDelete