बाबा रे,
निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?
कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !
असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी
ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.
म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.
कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
ReplyDeleteमनाचा वास होता एकेकाळी धुंद