अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!
त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!
सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!
काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!
हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;
दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!
कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!
काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?
पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा
मे १९२० ('मासिक मनोरंजन'मध्ये प्रसिद्ध)
मराठीतील प्रख्यात समीक्षक,विचारवंत कै. य. दी.फडके लिखित अण्णासाहेब लठ्ठे हे पुस्तक सद्या वाचत आहे.अण्णा लठ्ठे जसे स्त्री पुरुषांनी शिकावे यासाठी प्रयत्न करत तसाच प्रयत्न ते विद्यादान करणाऱ्यांच्या मदतीसाठी करत असत असे कणवाळू स्वभावाचे अण्णा त्या काळात कोल्हापूर दरबाराच्या शिक्षण खात्यात शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्या काळी दर्जेदार साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनोरंजन ह्या मराठी मासिकात अण्णा लठ्ठे यांचे लेख व एकनाथ पांडुरंग रेंदालकर यांच्या कविता प्रसिद्ध व्हायच्या. रेंदळकर कोल्हापूर संस्थानच्यासासा प्राथमिक शाळेत शिकवत होते.त्यांना दरमहा फक्त सात रुपये पगार होता.ह्या पोस्टमध्ये उल्लेख केलेली अजून चालातोची वाट...कविता त्यांच्या आर्थिक ओढगस्त आणि हलाखीच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटल्याचे य. दी फडके म्हणतात.
ReplyDeleteरेंदाळकरान सारख्या प्रतिभावंत कवीची आर्थिक विवंचना थोडीशी तरी दूर व्हावी म्हणून अण्णांनी त्यांना दरमहा सात रुपयां ऐवजी दरमहा पंधरा रुपये पगार द्यावा अशी शिफारस केली होती.पण वरिष्ठांनी फक्त दोन रुपयांची वाढ दिली. रेंदाळकरांसाठीआपण काही करू शकलो नाही याचे अण्णांना बराच काळ दुःख होत होते.
आज मी अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या चरित्राचे वाचन करताना ही कविता दृष्टीस पडू त्या कवितेविषयी माझे कुतूहल,जिज्ञासा जागी होऊन आंतरजालावर शोध घेतली असता ही संपूर्ण कविता वाचावयास मिळाली आणि खुप आनंद झाला.