Sunday, July 18, 2010

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.

5 comments:

  1. चाफ़्याशी माझे लहानपणापासूनच एक नाते जडले आहे. कसे? का? माहित नाही, पण चाफ़याचे झाड बघितले की मन मोहरून जाते.
    एकदा विद्याकडे गेले असता सुनिताबाईंनी म्हटलेली ही कविता ऐकली आणि मनाला खूप भावून गेली.

    ReplyDelete
  2. खूपच छान आहे. शेवटचं कडवं कहर आहे.

    ReplyDelete
  3. किती समजुतीचं सोसणं आहे. आणि पुन्हा चाफ्याच्या फुलांनी भरलेल्या ओंजळीबद्दल कृतज्ञताही.

    ReplyDelete
  4. आशा, धन्यवाद! ही कविता इथे आणलीस.
    सजवणे क्रियापदाचा इतका सुंदर उपयोग, मी कुठे वाचला नाही.
    अश्विनी, मला हे समजुतीचं सोसणं नाही वाटत, समजूतदार स्वीकार वाटतो. ’दु:ख नाही उरलं आता मनात’
    आपल्याच स्वप्नात आलेल्या चाफ्याच्या झाडावर, ’’का बरे आलास आज स्वप्नात” असं म्हणायचा हक्क, रूसवा, रागावणं, समजावणं किती गोड आहे!

    ReplyDelete
  5. खूब खूब छान

    ReplyDelete