Friday, October 8, 2010

आरती प्रभू : मृत्यूत कोणी हासे

मृत्युत कोणि हासे, मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो.

अश्रूत कोणि बुडतो, लपवीत कोणि अश्रू.
सोयीनुसार अपुल्या कोणि सुरात रडतो.

जनता धरी न पोटी साक्षात जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी पचवून हार घेतो.

विजनी कुणी सुखी अन भरल्या घरात कोणि
वनवास भोगणारा दुःखात शांत गातो.

कोणी जुनेपुराणे विसरे न पीळ धागे,
कोणी तुटून पडला, सगळ्याच पार जातो.

कोणास मेघपंक्‍ती दाटून गच्च येतां
लागे तहान, कोणी नाचून तृप्त होतो.

कोणी दिव्याशिवाय होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन टाकून झेप देतो.

1 comment:

  1. कोणास मेघपंक्‍ती दाटून गच्च येतां
    लागे तहान, कोणी नाचून तृप्त होतो.

    ReplyDelete