Thursday, October 28, 2010

कविता आहे.. ती आहे आणि असणारच आहे.

कवितेच्या वाटेवर या सदरातील हा शेवटचा लेख.कवितांच्या गावात वसलेला असावाच म्हणून येथे..

अरुणा ढेरे , शनिवार, १९ डिसेंबर २००९

प्रिय सुनीताबाई,
संध्याकाळचं आणि सकाळचं काही नातं असतं का? दोन्हीकडे दोघींसाठी उमलणारी फुलं आणि वेल्हाळणारी सोनारी उन्हं असतात हे खरं. आरती प्रभूंची एक कविता आहे ना-
सकाळ की सांज
कुणी म्हणायचे खोटी
दोन्हीकडे फुले
उन्हे माहेराला येती..
माहेरी आलेली उन्हं असतात आणि उमलती फुलंही असतात. पण सकाळच्या फुलांना दिवसभर उमलून असण्याचं आणि उन्हांना लखलखून उजळत राहण्याचं आश्वासन असतं. संध्याकाळ मात्र दोघांनाही चुपचाप अज्ञाताच्या अंधाराकडे सोपवून देते. दोघींमध्ये अंतर आहेच ना! सकाळ आणि संध्याकाळ मधलं अंतर. उल्हास आणि आसवं यांच्यामधलं अंतर. या कवितेचं पहिलं कडवं त्या अंतराचंच आहे.
खोप्यात सकाळी जागी होते चिमणी. जगण्याचा उल्हास आणि उडण्याचा आस घेऊन जागी झालेली चिमणी आणि दिवसभराचा अनुभव घेताना आत खोल झिरपलेल्या सुख-दुखांनी भरून येणारे डोळे! संवेदनांशी इमान राखणारे त्या डोळ्यांतले अश्रू!
सकाळची जाग
जशी खोप्यात चिमणी
सांजवेळी अश्रू
असे डोळ्यांस इमानी..
असं असलं तरीही दोघींमध्ये एक नातं आहेच. अंतर लंघून असणारं नातं!
कधी सकाळीही
ऊर भरू येता खोल
दिवेलागणीला
वाटे पाऊस पडेल..
असलं काही आतलं आतलं उमजलेले आरती प्रभू तुमचे केवढेतरी आवडते, यात नवल नाही. आपल्या जगण्याच्या पात्रात कधीतरी हिरव्या पानांच्या द्रोणांमधून तरंगत जाणारे केशरी दिवे दिसावेत, तशा त्यांच्या कविता खोप्यातल्या चिमणीसारखी संवेदनांची आतली जाग सगळ्या बाहेरच्या धकाधकीत टिकवून ठेवताना तुम्हाला त्या दिवेलागणीनं फार फार सुख दिलं.
कवी नव्हता तुम्ही. पण म्हणजे रुढ अर्थानं तुम्ही कविता लिहिल्या नाहीत, इतकंच. तुमच्या ललितबंधांत कवितेची जरीकाठी कशी मनोज्ञ नक्षीनं विणलेली आहे. कवितेवरच्या प्रेमानं भरलेलं एक प्रगल्भ, सृजनशील असं रसाळ मन तुमच्याजवळ होतं आणि कवितेनंही तुम्हाला जन्ममैत्रीण म्हणून स्वीकारलं होतं. ‘आहे मनोहर तरी’ हे तुमचं पहिलं जीवनचिंतन तुम्ही कवितेलाच तर अर्पण केलंत! किती जवळ होती कविता तुमच्या! भाईंबरोबरचे कितीतरी प्रवास सारा रस्ताभर कविता आठवत, म्हणत तुम्ही केलेत. तुमच्या घरी केलेल्या, ऐकलेल्या कवितांच्या सणा-उत्सवांचे रंग अजून पुष्कळांच्या मनावरून पुसले गेले नसतील.
काही प्रसंग शब्दांत कधी आणू नयेत, हे खरं असलं तरी तुमच्या घरातल्या सोफ्यावर- जिथे तुम्ही नेहमी बसायचात- तिथे बसलेले, थकलेले, आधी गेलेल्या मित्रांच्या स्मरणानं विकल झालेले श्री. पु. भागवत आणि त्यांच्या पायांशी खाली जमिनीवर बसून ‘अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चकाकते..’ म्हणणाऱ्या तुम्ही- असं एक डोळे ओलं करणारं चित्र अजून माझ्या आठवणींपाशी अगदी स्वच्छ, जिवंत आहे.
कितीतरी वेळा तुमचा फोन यायचा तो एखादी कविता आठवल्यावर किंवा पुरी आठवण्यासाठी. कितीतरी वेळा भेट व्हायची ती कवितेवर बोलण्याचं राहून गेलेलं बोलण्यासाठी आणि नव्या कवितेनं उमलून येण्यासाठी.
पुलंबरोबर तुम्ही मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचं अभिवाचन जाहीरपणे केलंत. तोपर्यंत स्वतच्या कविता कवी व्यासपीठावरून ऐकवत होते. तुम्ही इतरांच्या कविता तुमच्याशा करून घेऊन आलात आणि अभिवाचनाची एक नवी दिशा दाखवलीत. मराठी वाङ्मयाविषयीचा तो एक सूक्ष्मसुंदर विस्तार होता. तुमचं त्या वाचनातलं दर्शन किती अपूर्वाईचं! तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचा सगळा देह.. तुम्हीच ती कविता असायचा. तुमच्यातली अभिनेत्री तुमच्यातल्या रसिकतेबरोबर आपल्या सगळ्या गुणसंपदेचं अत्यंत संयत आणि अत्यंत तालेवार दर्शन देत असल्याचा तो उत्कट अनुभव होता.
कवितेनं तुमचं भिजून जाणं किती वेळा पाहिलं. पुलं असतानाच तुमच्या डोळ्यांची तक्रार वाढत गेली होती. वाचन कमी कमी होत चाललं होतं. अलीकडच्या चार-पाच वर्षांत तर ते जवळजवळ थांबलंच होतं. मग तुमच्याजवळ असायची ती तुमच्या आठवणीतली कविता. तिचा पैस फार मोठा नव्हता. मोजकेच कवी आणि मोजक्याच कविता. पण त्यांचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याइतका वाढवला होता. म्हणून शब्दांचा हात धरत त्यापलीकडच्या आशयापर्यंत उतरत जाणं आणि त्यात गर्द भिजून जाणं तुम्हाला सहजशक्य होत होतं.
कविता तुमच्या अगदी आतल्या गाभ्यालाच भिडली होती. तुमच्या स्वयंभू एकटेपणात फक्त तीच तुमच्या जवळ येऊ शकत होती. नव्हे, दोन्ही हातांनी तुम्हीच तिला तुमच्या जिवाजवळ घट्ट ओढून धरलं होतं. कविता इतकी सोबत करू शकते? अगदी प्रिय माणसाइतकी? त्याच्याहीपेक्षा जास्त? तुमचे आरती प्रभू लिहून गेले होते..
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा..

आजारी होऊन अंथरुणाला अगदी खिळूनच होतात. काही काळ असा आला की, तुम्ही अर्धवट ग्लानीत असायचा. जाणीव आणि नेणीव यांच्यामधली ये-जा सुरू असायची. तुमचा हात हातात घेऊन, कपाळावर हात ठेवून पाहिलं तरी स्पर्श पोहोचायचा नाही तुमच्यापर्यंत.. हात पोहोचायचा नाही. कधी चुकून डोळे उघडले तरी अनेकदा ओळख नजरेत दिसायची नाही. पण तुमच्या आवडीची एखादी कवितेची ओळ म्हणू लागल्यावर ते शब्द मात्र तुमच्या विस्मृतीच्या अंधारात अगदी तळापर्यंत उतरत जात असणार आणि ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ असा उजेड तिथे हळूहळू पसरत असणार. कारण तुमचे डोळे मिटलेले असले तरी ओठ हलू लागायचे.
‘गंधगर्भ भुईपोटी ठेवोनी वाळली’ अशी ओळ म्हटली की पाठोपाठ तुमचा अतिक्षीण आवाज यायचा- ‘भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी..’ वाटायचं- या भुईचाफ्याची पानं खरीच आता वाळली आहेत, पण भुईच्या पोटात जो गंधाचा कंद त्यांनी ठेवला आहे, त्याचा एक मंद सुगंध या अखेरच्या वळणावर येतो आहे आपल्याला. तुम्हालाही तो येत असेल असं खात्रीनं वाटायचं. इतकं तुमच्या अगदी जवळ आणखी कोणी नव्हतं. काही नव्हतं. तुम्ही लिहिलंत तशा प्रेम करणाऱ्यांच्या जातीत जन्माला आला होता तुम्ही. आणि तुम्ही म्हणतच असा की, प्रेम म्हणजे सर्वस्व समर्पण. कवितेवर तुम्ही फार फार प्रेम केलं.
हे सदर सुरू झालं तेव्हा तुम्ही फारशा भानावर नव्हताच. आता हे संपत असताना तुम्ही इथे- या जगातच नाही आहात. तुमच्या बाकीबाब बोरकरांनी म्हटलं होतं..

मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतिप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या राखेवर पण कोऱ्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री..


तुम्हाला मरणाचं भय कधी वाटलं नाही. आणि त्यानंतर मागे काय होईल, याचा तर विचारही तुम्ही केला नाही. पण आम्हाला असं वाटतं, तुमच्या आवडत्या कवितांनी तुमच्या डोक्यावर आता ती तशीच चंद्रफुलांची छत्री धरली असेल आणि ती छत्री घेऊन आनंदानं हसत तुम्ही त्या गहनगाढ अंधारात शिरला असाल.
तुमच्या एकटेपणाबद्दल मनाला कधी विषाद वाटला नाही. कींव करावी असलं काही तुमच्याजवळ कधी फिरकलंही नव्हतं. उलट, काहीतरी दरवळणारं, बहरलेलं पाहिल्याचा भाव मनात भरून यायचा. तुम्हाला निरोप देतानाही मनात तसाच, तोच भाव होता आणि आहे. खूप मोठी असते कविता. तिची सोबत अख्ख्या आयुष्याला पुरेशी असते- नव्हे, पुरूनही उरते. हे तुमच्याइतक्या जवळून अनुभवताना आता स्वतला आणि सगळ्यांनाच सांगावंसं वाटतंय की, कविता आहे.. ती आहे आणि असणारच आहे.
निरोप द्यायचा आणि घ्यायचा, तो इतकाच.

No comments:

Post a Comment