रस्त्याच्या दगडी छातीवर
वाट लाजरी भाळून गेली
आणिक घेऊन वळण जरासे
जरा लाजुनी त्यास म्हणाली..
'कोठून आला सांगा ना पण ,
कुठे चालली आपुली स्वारी..?'
रस्ता वदला, 'ते नच माहित,
मागून आलो, पुढे भरारी'
वाट म्हणाली, 'का प्रेमाला
या प्रश्नांचे पथ्य असे तर..?'
रस्ता वदला, 'प्रेमामध्ये
प्रश्न संपती उरते उत्तर!'
वाट मिळाली रस्त्याला मग
लाली चढली त्या रस्त्यावर,
वटवृक्षाने म्हटले मंगल
तोही होता उभा तिठ्यावर!
No comments:
Post a Comment