आपल्याला नसतेच ठाऊक
आपल्या आभाळाची उंची
आतली अन बाहेरचीही.
आपल्यासाठी असते ती
आपल्या दृष्टीच्या झेपेइतकी.
सवयीच्या, ओळखीच्या, सुरक्षित अवकाशात
आपणच आखलेली.
कधीतरी...
दाखवतं..जागवतं..हलवतं..
कुणीतरी आपल्याच आतलं अनिश्चित, असीम आभाळ-
शब्दांनी, सुरांनी, स्पर्शांनी...
आपल्यातल्याच काळ्यापांढर्याला
एकमेकांत मिसळीत बनलेल्या करड्यांच्या असंख्य छटांनी.
मग दिसायला नि उमगायला लागतात
त्या करड्याशी उठलेली
अनंत रेषांची आपापली मोर-वळणे!
हसरी, नाचरी, दुखरी
स्वत:ला मिरवणारी,
स्वत:च मुरलेली,
कुणातून तरी उठलेली,
कुणापाशी तरी मिटलेली,
तुर्यातुर्यात खोचलेली
आकाशात सुटलेली....!
नवेच होऊन जातात अशानं
स्वत:कडे पाहण्याचे सगळे सरावाचे रस्ते
धडपडते दृष्टी... झेपावते
संकटांच्या, पराभवाच्या भीतीवरून अलगद...
उंचच उंच होऊ पाहते
आपले सामान्य आभाळ!
मस्त!
ReplyDeleteआणि मोर-वळणे हा शब्द किती छान आहे!
यासोबतचं चित्रही सुरेख आहे.
ReplyDeleteरमाकांत धनोकरांनी काढलेली मोरांची चित्रे पाहून सुचलेल्या कवितांपैकी एक आहे.