Saturday, July 31, 2010

अरुणा ढेरे : अनय

अनय
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !

Tuesday, July 27, 2010

सौमित्र : तर काय करायचं?

परक्या देशात
दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरुन चालताना....
आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले
                                                         तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस  सोबत असताना
एकटं वाटलं  तर काय करायचं
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
एकटं ’नाही’ वाटलं  तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
’त्याला’ एकटं वाटू लागलं  तर काय करायचं....
परक्या देशात आपलं माणूस
आधीच एकटं असेल तर काय करायचं
आणि परक्या देशात
आपलं माणूस कुणासोबत असेल
                                           तर काय करायचं?
परक्या देशात
लहानपणी गर्दीत हरवलं होतं म्हणून
आपलं माणूस ओळखीची गर्दी सोडून
अनोळखी गर्दीत आलंय उठून
’हे’ कळल्यावर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस
खूपच आपलं वाटू लागल्यावर
आपण आपलीच सोबत सोडून देऊन
हरवून गेलो
आणि सापडलो नाही आपल्यालाच
                                             तर काय करायचं....  
परक्या देशात
प्रत्येक मिठीसरशी साठवून घेतला सुगंध आपल्या माणसाचा....
आणि आपल्या देशात
कधीतरी अचानक
सुटला घमघमाट त्या सुगंधाचा
तर काय़ करायचं....
आपल्या देशात
परक्या देशातल्या आपल्या माणसाची
आठवण आली अचानक
आणि हरवून गेला साठवलेला सुगंध
                                                तर काय करायचं....   
परक्या देशात 
सोबत घालवलेली संध्याकाळ
आपल्या देशात
’संध्याकाळी’ आठवली तर काय करायचं?
 
खरंच!
परदेशातून
एकटं परतल्यावर
आपल्या देशात 
काय करायचं?

Wednesday, July 21, 2010

शांता शेळके

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे
हिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?
पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाण
निर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखुण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?

मुखवटाही असेल, असो... मागले काहीच नये दिसू
साधे शब्द पुरेत तेच, एक साधे सोपे हसू...

बा.भ.बोरकर.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

भाऊसाहेब पाटणकर

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

Tuesday, July 20, 2010

ऊंचाई

ऊँचे पहाड़ पर,
पेड़ नहीं लगते,
पौधे नहीं उगते,
न घास ही जमती है।

जमती है सिर्फ बर्फ,
जो, कफ़न की तरह सफ़ेद और,
मौत की तरह ठंडी होती है।
खेलती, खिल-खिलाती नदी,
जिसका रूप धारण कर,
अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है।

ऐसी ऊँचाई,
जिसका परस
पानी को पत्थर कर दे,
ऐसी ऊँचाई
जिसका दरस हीन भाव भर दे,
अभिनंदन की अधिकारी है,
आरोहियों के लिये आमंत्रण है,
उस पर झंडे गाड़े जा सकते हैं,

किन्तु कोई गौरैया,
वहाँ नीड़ नहीं बना सकती,
ना कोई थका-मांदा बटोही,
उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है।

सच्चाई यह है कि
केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती,
सबसे अलग-थलग,
परिवेश से पृथक,
अपनों से कटा-बँटा,
शून्य में अकेला खड़ा होना,
पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है।
ऊँचाई और गहराई में
आकाश-पाताल की दूरी है।

जो जितना ऊँचा,
उतना एकाकी होता है,
हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका,
मन ही मन रोता है।

ज़रूरी यह है कि
ऊँचाई के साथ विस्तार भी हो,
जिससे मनुष्य,
ठूँठ सा खड़ा न रहे,
औरों से घुले-मिले,
किसी को साथ ले,
किसी के संग चले।

भीड़ में खो जाना,
यादों में डूब जाना,
स्वयं को भूल जाना,
अस्तित्व को अर्थ,
जीवन को सुगंध देता है।

धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इंसानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,

किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई काँटा न चुभे,
कोई कली न खिले।

न वसंत हो, न पतझड़,
हो सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलेपन का सन्नाटा।

मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
ग़ैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।

- अटल बिहारी वाजपेयी

Monday, July 19, 2010

यौवनयात्रा

अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला?
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी
अजून फुलती तुझ्या उशाला

अशीच असते यौवनयात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जळत्या जखमांवरी स्मितांचे
गुलाबपाणी शिंपित जावे

जखमा द्याव्या जखमा घ्याव्या
पण रामायण कशास त्याचे?
अटळ मुलाखत जर अग्नीशी
कशास कीर्तन रोज धुराचे?

उदयाद्रीवर लक्ष उद्याची
पहाट मंथर तेवत आहे
तुझ्याचसाठी लाख रवींचे
गर्भ सुखाने साहत आहे!

-कुसुमाग्रज

Sunday, July 18, 2010

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.

Tuesday, July 13, 2010

विन्दा : साठीचा गझल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!

Saturday, July 10, 2010

प्रेमाचा गुलकंद.......प्र.के.अत्रे

बागेतुनी व बाजारातुनी
कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत
‘तिज’ला नियमाने
कशास सान्गू प्रेम तयाचे
तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले
काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रीका
लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या
पाठोपाठ नुसत्या

प्रेमदेवता प्रसन्न हो! या
नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी
जाणती नवतरणे

कधी न त्याचा ती अवमानी
फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला
कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ
असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग
मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची
प्रेमतपश्चर्या
रन्ग दिसे ना खुलावयाचा
तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे
तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो
गोन्डस तिज तो लावी

“बान्धीत आलो पुजा तुज मी
आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू
भक्ताचे काज

गेन्द गुलाबी मुसमुसणारे
तुला अर्पिलेले
सान्ग सुन्दरी फ़ुकट का सगळे
गेले?”

तोच ओरडून त्यास म्हणे ती
“आळ ब्रु था हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही
दिल्यापैकी”

हे बोलूनी त्याच पावली आत
जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी
कसलीशी बरणी

म्हणे “पहा मी यात टाकले
तुमचे ते गेन्द
आणि बनवला तुमच्या साठी
इतुका गुलकन्द

का डोळे असे फ़िरवता का आली
भोन्ड
बोट यातले जरा चाखुनी गोड
करा तोन्ड”

क्षणैक दिसले तारान्गण
त्या परी शान्त झाला
तसाच बरणी आणि घेवुनी
खान्द्यावरी आला

“प्रेमापायी भरला” बोले
“भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी
कशास हा दवडा?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी
जगला
‘दय थाम्बुनी कधीच ना तरी
असता तो’ खपला!

तोन्ड आम्बले असेल
ज्यान्चे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी
चाखूनी हा बघणे

कुसुमाग्रज : तो प्रवास सुंदर होता

आकाशतळी फुललेली
मातीतिल एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी ?

तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती

सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधुनी
गीतांचे गेंद उदेले

पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदणे होते

Friday, July 9, 2010

पत्र लिही

पत्र लिही पण नको पाठवू
शाईअमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधुनी
नको पाठवू हसू लाजरे;

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटींतुन
नको पाठवू तिळ गालिचा
पुर्णविरामाच्या बिंदूतुन

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन,
कागदातुन नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू विज सुवासिक
उलगडणारी घडी घडीतुन,
नको पाठवू असे कितीदां
सांगितले मी; तू हट्टी पण

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायचे राहुन जाते.

इंदिरा संत
नीरज स्मिता खास तुम्हा दोघांसाठी. काल पाठवू शकलो नाही.

Thursday, July 8, 2010

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

-इंदिरा संत ('रंगबावरी')

मी विझल्यावर

मी विझल्यावर
त्या राखेवर
नित्याच्या
जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे
थंड काजळी
उठेल थडगे
केविलवाणे

मी विझल्यावर
त्या राखेवर
पण कवण्या
अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या
कविता माझ्या
धरतील
चंद्रफुलांची छत्री


---बा. भ. बोरकर