Showing posts with label ग.दि.माडगूळकर. Show all posts
Showing posts with label ग.दि.माडगूळकर. Show all posts

Monday, September 17, 2012

ग.दि.माडगूळकर -- जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

"मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे."

Tuesday, November 30, 2010

पर्गती?

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?

गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?

उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली

माझ म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय

गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?

पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

-ग.दि.मा.




(‘पूरिया’ या ग.दि.मां च्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. प्रस्तावनेत शांता शेळके लिहितात:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॄषिकांचे, दलितांचे, सा-या हीनदीन जनतेचे भाग्य उजळून टाकण्याच्या हेतूने शासन कटिबध्द झाले. नवनव्या योजना आखल्या गेल्या. उध्दाराचे नारे उठले. पण प्रत्यक्ष हातामधे काय आले? ‘पूरिया’ मधील ‘कृषिकांचे पालुपद’, ‘पर्गती’, ‘भूमिहीन’ या कविता लक्षणीय आहेत. उपरोधपूर्ण आणि तळमळीच्या भाषेत कवी ‘धानू शिरपती’ या कृषिकाशी त्याच्याच ग्रामीण बोलीभाषेत संवाद करत आहे. हा संवाद माडगूळकरांच्या उत्कट जाणिवेचा जसा निदर्शक आहे, तसा त्यांच्या नाटयात्म चित्रदर्शी शैलीचाही सुंदर नमुना आहे. ‘पर्गती’ या कवितेत सर्व शासनावरच बैलगाडीचे रुपक कवीने केले आहे.)