Showing posts with label विंदा. Show all posts
Showing posts with label विंदा. Show all posts

Monday, May 13, 2013

विंदा करंदीकर -- प्रेम करावे असे, परंतू….


हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.
प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.
प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू….
प्रेम करावे हे कळल्याविण.

Wednesday, June 15, 2011

विन्दा करंदीकर - निळा पक्षी


काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 
प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
 
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.
 
तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.
 
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
 
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.
 
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 

Tuesday, January 11, 2011

विंदा करंदीकर - ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.

Wednesday, October 13, 2010

विन्दा करंदीकर - चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.

मी चालतों अखंड चालायचें म्हणून;
धुंदींत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीड तोडले कीं अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनाचा मीं फाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.

आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचें;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे.

Saturday, September 18, 2010

विंदा करंदीकर - एक प्रश्नोत्तर

रस्त्याच्या दगडी छातीवर
वाट लाजरी भाळून गेली
आणिक घेऊन वळण जरासे
जरा लाजुनी त्यास म्हणाली..
'कोठून आला सांगा ना पण ,
कुठे चालली आपुली स्वारी..?'
रस्ता वदला, 'ते नच माहित,
मागून आलो, पुढे भरारी'
वाट म्हणाली, 'का प्रेमाला
या प्रश्नांचे पथ्य असे तर..?'
रस्ता वदला, 'प्रेमामध्ये
प्रश्न संपती उरते उत्तर!'
वाट मिळाली रस्त्याला मग
लाली चढली त्या रस्त्यावर,
वटवृक्षाने म्हटले मंगल
तोही होता उभा तिठ्यावर!

Tuesday, July 13, 2010

विन्दा : साठीचा गझल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!