Showing posts with label उषा मेहता. Show all posts
Showing posts with label उषा मेहता. Show all posts

Sunday, July 22, 2012

उषा मेहता - मितवा


कुणीतरी....
हवं,
हवंच
असं कुणी
ज्याच्याशी बोलता येईल मनमोकळं
ज्याच्याबरोबर गाता यईल, नाचता येईल
डोंगरदऱ्यांत, सागरलाटांत
मनभरून विहरता येईल
मनमुराद हसता येईल
कधीतरी, रडता येईल
समजून घेता येईल एकमेकांना
असं कुणी
हवं
खास आपलं
ज्याच्याशी जुळेल, मैत्र जिवाचं...
******
झाला अखेर तो कल्पान्त...
साद घातलीस मला आपण होऊन
पराजित केलंस माझ्यातल्या हट्टीपणाला
कसं आसुसलं होतं हे मन
किती नि कसे सोसले ते अधीर क्षण
अगा प्रेमा...
कृतज्ञ आहे मी तुझ्याप्रती
अंतरीची खूण पटल्यावर, आता
मी विचारतेय मलाच
मीच का नाही आले आपण होऊन तुझ्याकडे?
का नाही विरघळले सहजपणे?
अहंकार?
संकोच?
संस्कार?
जाऊ दे, ओळखलं आहेस तू मला, माझ्यापेक्षाही
आता तरी
मुक्तमन होऊन समजून घेऊया प्रेम म्हणजे काय..
*******
इतकी आनंदात असते नं मी तुझ्या संगतीत
सारंसारं बोलू शकते तुझ्याशी, विनासंकोच, विनासायास
मनातले, डोक्यातले, सारे कल्लोळ शांत होऊन जातात
तुझ्याशी असं बोलण्यानं
नि:शंक होऊन जाते मी
कधीकधी तर काही सांगावंदेखील लागत नाही
सांगण्याआधीच कळून गेलेलं असतं ते तुला!
कसेलदेखील ताण नसतात
गरजच नसते मानभावी वागण्याची
तुझ्या नजरेला मी कशी दिसते, बरी... सुंदर...
तर असलंही येत नाही कधी मनात
कारण, मला माहीत आहे
मी आहे जशी, तशीच मनोमन आपली मानली आहेस तू मला
********
तू आहेसच
पण मी गृहीत नको धरायला तुला सदासर्वकाळ
मला कळतंय
एकच व्यक्ती नाही पुरत भावनांच्या, विचारांच्या आवर्तात
निमित्तांनी, कारणांनी, जवळ येत असतात अनेकजण.
आपल्यालाही वाढायचं असतं वेगवेगळया परींनी, दिशांनी,
स्वतंत्रपणे
हे नीट उमजून घ्यायला हवं आता
जवळ आलेल्या काहींशी
जुळून जातात सूर अभावितपणे
काहींशी विसंवाद
आपल्यातही असा विसंवाद उद्भवू शकतो
अशा वेळीही सहन करू आपण एकमेकांना
समजून घेऊ एकमेकांना, क्षमाशील राहू या
एकमेकांचे आहोत आपण
या विसंवादात खोटेपणा नसेल यत्किंचितही, म्हणूनच
असणार आहोत आपण सहप्रवासी, शेवटपर्यंत
*******
दारासमोर साठलेल्या या पाण्यात
किती मजेत विहरताहेत या चिमण्या
पंखांनी तुषार उडवताहेत
चिवचिवाट करताहेत
जणू कळलंय त्यांना, की
पाणी म्हणजेच जीवन
आणि जीवनाची अथांगता, अपारता...
ती आपल्या आकलनात येऊ शकेलं?
प्रयत्न तर करू या ना
किती छान आहे हे सारं
जोडीनं समजून घेताना

*******