Saturday, November 21, 2015

बा भ बोरकर : समुद्र बिलोरी आयना

समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला पांचवा म्हैना

वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली कार्तिक नवमीची रैना

कटीस अंजिरी नेसू
गालात मिस्कील हसू
मयूरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना

लावण्य जातसे उतू
वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना

Saturday, November 14, 2015

वेडा


स्वप्न विकायला काढलेला एक वेडा
परवा फिरत होता आपल्याच शहरातल्या गल्ल्यांमधून..
ओरडत होता, "हे सगळं फुकट आहे;
फक्त तुमचे डोळे मला एकदा तपासू द्या.
ही स्वप्न पहायची ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढं मला कळलं की बस!
मग हे सारं तुमचं!"
लोक हसले त्याला, खूप हसले!
त्याच्या डोळ्यातलं वेड उतरलंच नाही पण
शेवटपर्यंत..
काल रात्री समुद्राच्या काठाशी पाहिलं
त्याला कोणी कोणी, अखेरचं..
लाटांमध्ये जाताना किना-यावर भिरकावून दिली एक होडी त्याने,
म्हणाला, "माझ्या मागे येईलच एखादा वेडा.
स्वप्नांमध्ये बुडता बुडता
कोणाच्याच हाती किनारा लागला नाही,
असं नको व्हायला..!!"
होडी काठावर अजून हिंदकळतेच आहे..

- स्पृहा जोशी

Wednesday, November 4, 2015

मन - मेघा देशपांडे

मन

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरे

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ

- मेघा देशपांडे

Tuesday, November 3, 2015

सगळं काही तोडून गेलास जाता जाता,

सगळं काही तोडून गेलास जाता जाता,
हौसेने बांधलेल्या माझ्या छोटयाश्या घरकुलाची
ढलपी ढलपी जळत राहिली.
मातीशी इमान राखणारं एकच झाड आता शिल्लक राहिलंय;
बाकी आपली सारी फुलं वा-यासोबत भरकटत भलत्याच अंगणात रुजत राहिली!!
बरं, इतकं सगळं होउन
मला पाण्यात पाहणा-या
तुझ्या नव्या अंगणात
जरी नांदली असती सावली,
तरी हसत हसत झेलली असती मी
इथल्या उन्हाची काहिली.
पण 'तुझं' असं काहीच
उभारू शकला नाहीस तू
ना घरकुल, ना अंगण
ना सावली, ना एखादं इमानी झाड !
आता ढलपी ढलपी रोज जळत राहतोस आतल्या आत..
वा-यासोबत भरकटत
आपल्या काही जुन्या कविता गुणगुणत
शोधत राहतोस ,
पुन्हा एकदा, एक नवी रुजवात..!!

- स्पृहा जोशी

तुला वाचून काढावे

तुला वाचून काढावे जरासे पुस्तका ऎसे
हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे ,
निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी
मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे...!!

     ............स्पृहा जोशी........

Monday, November 2, 2015

भा. रा. तांबे - जन पळभर म्हणतील

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जातां राहील कार्य काय ?

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?