Monday, December 31, 2012

सुरेश भट : अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा...
तिजोऱ्यांत केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळमाती
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतंही न वाली, अरे पुन्हा...
उभा देश झाला आता एक बंदिशाळा
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली, अरे पुन्हा...
धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, अरे पुन्हा...
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली