Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts
Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts

Tuesday, February 14, 2012

सुधीर मोघे -- एक सांगशील


एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?

क्षणाभोवती
ही कसली रंगत खुलते आहे?
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू?
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे

तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदळणं हिताचं नाही
माझ्यापुरतं बोलायचं
तर मला माझी दिशाच नाही

तुझ्या संगतीत
आनंद आहे. आश्वासन आहे, दिलासा आहे.
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
भंगण्याचाच वसा आहे

म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून, चटका लावून,
निदान दूर होणं तरी असू नये

पण अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो

सुधीर मोघे -- दाटून आलेल्या संध्याकाळी


दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागून कधीच मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश, पाणी, तारे-वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम, स्वप्नं, तळमळ-सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
सारय़ा सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफ़ल-विफ़लतेला
खरतरं काहीच महत्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं