Friday, November 18, 2022

झाड लागले मोहरू - शंकर रामाणी

झाड लागले मोहरू...


पैस आलिये माहेरा

फुले आकाशमोगरा.

देह अवघाचि दर्वळ

भरून ओसंडे ओंजळ.

शुभ्र तितुकेच झेलू

सारे अवकाश तोलू 

झाड प्राणांचे लेकरू

पायी पैलाचे घुंगरू.

-------------------------------

झाड लागले मोहरू... म्हणजे आतलं कवितेचं झाड मोहरायला लागलं आहे.... कविता होण्याच्या प्रक्रियेची ही कविता आहे.

 झाड अजून मोहरलं नाहीये, मोहरू लागलं आहे.... या प्रक्रियेत कवी आपल्याला सामावून घेतो आहे.... We are honoured.... ही श्रीमंती आहे.... हळूवारपणे या, हे मोहरणं अनुभवूया.

पैस आलिये माहेरा

फुले आकाशमोगरा

पैस आलिये माहेरा... पैसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. खांबाला टेकले आणि सुचत गेलं... तो प्रतिकात्मकरित्या सुचण्याचा, प्रतिभेचा खांब आहे.

हे सुचणं, ही प्रतिभा माहेरी आली आहे. म्हणजे काय? प्रतिभेची/सुचण्याची अनेकानेक कामं कवी करतो, प्रतिभेचं मूळ घर, खरं काम काय आहे? तर कविता करणं... दुसरी कुठली कुठली छोटी मोठी, रोजीरोटी साठीची, संसाराची, जबाबदाऱ्यांची काम करत राहणारी प्रतिभा, ... ही तिच्या माहेरी आली आहे. 

त्यामुळे काय झालंय की कवितेचा आकाशमोगरा फुलला आहे. या फुलांना गुंफून कवी कविता घडवेल.

देह अवघाचि दर्वळ

भरून ओसंडे ओंजळ

 जेव्हा हे कवितेचं झाड आत फुललं आहे तेव्हा अवघा देह दरवळून गेला आहे. खरं म्हणजे देह हा दर्वळ झाला आहे. सुगंध दरवळणे आणि आपण तो अनुभवणे वेगळं.... तो दरवळ आपण होणे वेगळं.... कसलं अलवार आहे हे!

 आतमधे असा कवितेचा आकाशमोगरा जेव्हा फुलतो तेव्हा देह दरवळ होऊन जातो.... .......

 कवीला आजूबाजूचं भान नाही.. तो हलका आणि सुगंधी झाला आहे, त्याचा शारीर अनुभव तो घेतोय... इतका तो कवितेत.... कविता घडवण्यात... तिला जन्माला घालण्यात मग्न आहे.

 भरून ओसंडे ओंजळ... अशा वेळी त्या आकाशमोगऱ्याच्या फुलांनी आणि गंधानेही ओंजळ भरुन/ ओसंडून वाहते आहे.

शुभ्र तितुकेच झेलू

सारे अवकाश तोलू

ही कविता घडवताना मग ... शुभ्र तितुकेच झेलू.... त्या फुलांमधली शुभ्र फुलं तेवढी घ्यायची... कवितेसाठी... शुभ्र ते ते शब्द घेऊ.

 इथे झेलू आहे हं! वेचू नाही.

वेचायची फुले ही जमिनीवर पडलेली असतात मग ती आपण वेचतो.

इथे फुल गळलं की झेलणं आहे.... ही कविता अशी वाहती आहे.... वर्तमानातली आहे..... प्रक्रिया आहे.... घडते आहे....

सारे अवकाश तोलू.... कवितेतील शब्दांनी सारं अवकाश... कवितेचं अवकाश... तोलून धरू... तोलणं हे देखील .... चालू वर्तमानकाळ...

झाड प्राणांचे लेकरू

पायी पैलाचे घुंगरू

हे जे कवितेचं, आकाशमोगऱ्याचं झाड आहे.... ते प्राणांचं लेकरू आहे.

 म्हणजे? कुणीतरी आपल्या जीवाच्या जवळचं असतं, आवडतं असतं.... हे त्यापेक्षा धगधगतं आहे... जीव या शब्दापेक्षा प्राण हा प्रखर शब्द आहे.... पुन्हा शुभ्र तितुकेच झेलू.... प्राणांचं लेकरू म्हणजे प्राण गुंतलेला.. जसा लेकरात असतो आणि त्यापेक्षाही ही कवितेच्या जन्माची प्रक्रिया आहे... आणि प्रतिभेने हा जीव जन्माला घातला आहे, म्हणून लेकरू.... काव्यप्रतिभा ही कवीचे प्राण! कविता हे तिचं लेकरू !

 झाड प्राणांचे लेकरू

 पायी पैलाचे घुंगरू

या लेकराच्या पायात पैलाचे घुंगरू आहेत.

 पैल..... जे ऐल नाही ते पैल...

जे शब्दात धरता येत नाही ते शब्दांच्या पैल

 या घुंगरांचा नाद या कवितेला आहे.

  -- विद्या कुळकर्णी