Showing posts with label अनिल. Show all posts
Showing posts with label अनिल. Show all posts

Wednesday, July 25, 2012

अनिल - उशिराचा पाऊस

असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा
टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा
डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा
कोरडे पडले ओठ उघडून, वरच्यावरती चुंबून घ्यावा
त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे
खोटे भरवसे देत रहाणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे

सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधिर होणे
पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे
त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा
पाटघडय़ांवर बसवून त्याशी कोडकौतुकाचा खेळ खेळावा


Friday, July 6, 2012

हुरुप - अनिल


कुठून येतो हा हुरुप मला?
खाली घातलेली मान वर होते
हारलेले हात पुन्हा लागतात मुठी आवळू
खचली कंबर पुन्हा ताठ होते
पेलण्यास ओझे
पावले थकली चढू पाहतात
अडल्या वाटा
कुठून येतो हा हुरुप मला !

शिणलेला आणि वैतागला मी
गोळा करताना वाळली पाने
मातीमध्ये हात मळवीत होतो
आहे का ह्या सुप्त मातीमध्येच
असे सामर्थ्य
स्पर्शानेच जागणारे चैतन्य ?