Showing posts with label मर्ढेकर. Show all posts
Showing posts with label मर्ढेकर. Show all posts

Wednesday, February 18, 2026

मर्ढेकर - शिशिरागम

शिशिरागम

 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
 एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें! 

 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 

 - बा. सी. मर्ढेकर 

 शिशिर ऋतू आहे आणि पानगळ सुरू झाली आहे... यावेळी ही कविता आठवतेच आठवते. 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
  एकेक पान आहे. इथे प्रत्येक पान महत्त्वाचं आहे हे कळतं आणि एकेक मधे ती गळण्याची संथ गती आहे. 
 उगाच रडावया.. 
 असं एकेक पान गळत असता उगाच रडायला येतं. कळतही नाही, का ते! 
 पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें 
 रडायला येण्याचं एक कारण आहे हे! 
पाखरं कशी आहेत? इवली आणि सुकोमल 
 जातील सांग अता कुठे? इथे आपल्याला कळतं की हे कुणाशी तरी बोलणं चाललेलं आहे. कोण आहे ती? 
 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 जेव्हा इथे पानगळ होते आहे तेव्हा तिच्या बागेत बकूळ... बकुलावली असं म्हटलं आहे. तिच्या बागेतल्या झाडालाही असं एक आवडीचं नाव दिलेलं आहे, फुलली आहे. शिशिर ऋतू ने बकुलावली ला फुलवलं आहे आणि बाकी कविच्या बागेतल्या झाडांची पाने त्यामुळे गळताहेत. 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 आता थोडं हायसं वाटतं आहे की कुठेतरी या पाखरांना जायला जागा आहे. 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 
सुहास ही कवीची प्रेयसी आहे, तिच्याशी मागे कधीतरी, वियोगाच्या वेळी बोलणं झालं आहे, तेव्हाची तिची आसवे आठवून, तिच्या प्रेमाची खात्री असल्याने, कवी तिला विचारतो आहे की तूच आता सांग.. शिशिर ऋतू त एकेक पान गळायला लागलं की मला असं का होतं? माझ्या पेक्षा तू मला जास्त ओळखतेस तूच सांग.
 हा एक साधा कळणारा अर्थाचा वरचा थर आहे. 
 त्याच्या आतला थर कुठला? शिशिर ऋतू म्हणजे काय? हे पानगळ होणारं झाड कुठलं? शिशिर म्हणजे नैराश्य, उदासपणाचा मनाचा ऋतू आहे. झाड हे मन आहे. बाहेर शिशिर असेल तेव्हा आतल्या शिशिराची आठवण येते आणि आतला शिशिर सुरू झाला की बाहेरचा शिशिर आठवतो असंही आहे. 
 पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे स्वप्नं आहेत.. दोघांनी मिळून पाहिलेली. मनाच्या शिशिर ऋतूत असं होतं की ती स्वप्नं सांभाळता येत नाहीत. बकूळ मात्र सदाहरित, पानांनी गच्च भरलेला, सुगंधी फुले असणारा आहे, त्याच्यावर शिशिराचा अंमल चालत नाही. अशा वेळी ती इवली सुकोमल स्वप्नं ती सहज सांभाळते. ....... जरि लागले एकेक पान गळावया यातला महत्त्वाचा शब्द आहे, पुनरागमे शिशिरर्तुच्या पुनरागमे हा पुन्हा आलेला शिशिर आहे, तो ही ग्वाही देतो की तो पुन्हा जाणारही आहे आणि वसंत येणार आहे. 
 कविता नुसती एक घटना, मनातली हालचाल, एक गोष्ट सांगणारी नसते. कवितेत हे महत्त्वाचं असतं की ती कशी सांगितली आहे? कवितेचा घाट, लय आणि शब्दांची निवड! त्याने काय होतं की अर्थ नाही कळला तरी ती कविता सारखी सारखी आठवते, म्हणावीशी वाटते. अशी म्हणत असता तिचा अर्थही न कळता, कळल्यासारखा वाटायला लागतो. किंबहुना जे शब्दात मांडताच येणार नाही तेही कळल्यासारखं होतं, ती वाचताना थेट अनुभव देते....
 शिशिरर्तुच्या पुनरागमे... 
एकेक पान गळावया... 
कां लागता मज येतसे... 
नकळे उगाच रडावया....
 ती उदासी, ते रडायला येतसं होणं.... व्हायला लागतं. 
 खरं म्हणजे चांगल्या कवितेला ज्याचं त्यानं भिडावं हेच खरं.... नंतर त्यावर काही बोलू नये.... त्या कवितेत राहावं... 

 -- विद्या कुळकर्णी 
  २८ फेब्रुवारी २३

Wednesday, January 12, 2011

मर्ढेकर - पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

Thursday, October 21, 2010

किती तरी दिवसांत.....

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा


- बा.सी.मर्ढेकर

Tuesday, October 12, 2010

मर्ढेकर - शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरें!

           फुलली असेल तुझ्या परी,
           बागेतली बकुलावली;
           वाळूंत निर्झर-बासरी;
           किती गोड ऊब महितलीं!
           येतील हीं उडुनी तिथे,
           इवली सुकोमल पाखरें,
           पानात जीं निजली इथे.
           निष्पर्ण झाडिंत कांपरें!
           पुसतो सुहास, स्मरुनिया
           तुज आसवें, जरि लागलें
           एकेक पान गळावया
           शिशिरर्तुच्या पुनरागमें.

Wednesday, September 22, 2010

मर्ढेकर

            दवांत आलिस भल्या पहाटीं
            शुक्राच्या तोर्‍यांत एकदा;
            जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
            तरल पावलांमधली शोभा.

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
                                            ---मागे
             वळुनि पाहणे विसरलीस का?
             विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
             डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
             सांग धरावा कैसा पारा !

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
             कोमल ओल्या आठवणींची
             एथल्याच जर बुजली रांग !

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणिं पुसाव्या;
             तांबुस निर्मल नखांवरी अन
             शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या !
    
         दवांत आलिस भल्या पहाटीं
         अभ्रांच्या शोभेंत एकदा;
         जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
         मंद पावलांमधल्या गंधा.