Thursday, September 30, 2010

मेरी आवाज ही

मला माहित नाही याला गाणं म्हणायच की कविता. पण माझं हे अतिशय आवडत गाणं आणि तेव्हढेच आवडते शब्द.

माझ्या आवाज हरवलेल्या मित्रास....

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

वक्तके सितम कम हसी नही, आज है यहा कल कही नही
वक्तके परे अगर मिल गये कही
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

जो गुजर गयी कल की बात थी, उम्र तो नही एक रात थी
रात का सिरा अगर फिर मिले कही
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

दिन ढले जहा रात पास हो, जिंदगी की लौ उन्ची कर चलो
याद आये गर कही जी उदास हो
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

- गुलझार

हे गाणं इथे ऎकता / पाहता येईल

http://www.youtube.com/watch?v=VTTPentp0_g&feature=related

Monday, September 27, 2010

अरुणा ढेरे : इतक्यातच

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकुन उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधुर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ऒंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी ही सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली

Wednesday, September 22, 2010

मर्ढेकर

            दवांत आलिस भल्या पहाटीं
            शुक्राच्या तोर्‍यांत एकदा;
            जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
            तरल पावलांमधली शोभा.

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
                                            ---मागे
             वळुनि पाहणे विसरलीस का?
             विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
             डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
             सांग धरावा कैसा पारा !

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
             कोमल ओल्या आठवणींची
             एथल्याच जर बुजली रांग !

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणिं पुसाव्या;
             तांबुस निर्मल नखांवरी अन
             शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या !
    
         दवांत आलिस भल्या पहाटीं
         अभ्रांच्या शोभेंत एकदा;
         जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
         मंद पावलांमधल्या गंधा.

Monday, September 20, 2010

सुजाता लोहकरे : आपले सामान्य आभाळ!

आपल्याला नसतेच ठाऊक
आपल्या आभाळाची उंची
आतली अन बाहेरचीही.
आपल्यासाठी असते ती
आपल्या दृष्टीच्या झेपेइतकी.
सवयीच्या, ओळखीच्या, सुरक्षित अवकाशात
आपणच आखलेली.
कधीतरी...
दाखवतं..जागवतं..हलवतं..
कुणीतरी आपल्याच आतलं अनिश्चित, असीम आभाळ-
शब्दांनी, सुरांनी, स्पर्शांनी...
आपल्यातल्याच काळ्यापांढर्‍याला
एकमेकांत मिसळीत बनलेल्या करड्यांच्या असंख्य छटांनी.
मग दिसायला नि उमगायला लागतात
त्या करड्याशी उठलेली
अनंत रेषांची आपापली मोर-वळणे!
हसरी, नाचरी, दुखरी
स्वत:ला मिरवणारी,
स्वत:च मुरलेली,
कुणातून तरी उठलेली,
कुणापाशी तरी मिटलेली,
तुर्‍यातुर्‍यात खोचलेली
आकाशात सुटलेली....!
नवेच होऊन जातात अशानं
स्वत:कडे पाहण्याचे सगळे सरावाचे रस्ते
धडपडते दृष्टी... झेपावते
संकटांच्या, पराभवाच्या भीतीवरून अलगद...
उंचच उंच होऊ पाहते
आपले सामान्य आभाळ!

Saturday, September 18, 2010

विंदा करंदीकर - एक प्रश्नोत्तर

रस्त्याच्या दगडी छातीवर
वाट लाजरी भाळून गेली
आणिक घेऊन वळण जरासे
जरा लाजुनी त्यास म्हणाली..
'कोठून आला सांगा ना पण ,
कुठे चालली आपुली स्वारी..?'
रस्ता वदला, 'ते नच माहित,
मागून आलो, पुढे भरारी'
वाट म्हणाली, 'का प्रेमाला
या प्रश्नांचे पथ्य असे तर..?'
रस्ता वदला, 'प्रेमामध्ये
प्रश्न संपती उरते उत्तर!'
वाट मिळाली रस्त्याला मग
लाली चढली त्या रस्त्यावर,
वटवृक्षाने म्हटले मंगल
तोही होता उभा तिठ्यावर!

Thursday, September 16, 2010

इंदिरा संत


तारेवरती असती थांबुन,
थेंब दवाचे;
मनात ज्यांच्या,
इवले कांही, हिरवे पिवळे चमचमणारे....

सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनात ज्यांच्या,
इवले कांही,निळे जांभळे झनझनणारे....

छेडुन तारा करांगुलीने
ओठ करावे पुढती;
टिपायला ती थेंबाथेंबी...

Sunday, September 12, 2010

महानोर : पक्ष्यांचे लक्ष थवे

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्‍यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.

Wednesday, September 8, 2010

ग्रेस

मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥

श्वासांचे घेउन बंधन,
जे हृदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥

सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥

मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥

चल जाऊ दूर कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधितरी घात ॥

मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥

Monday, September 6, 2010

वा.रा.कान्त - दु:खालाच कारण होतात

दु:खालाच कारण होतात त्याच्या
सांबराची शिंगे,
तसेच माणसांचे संबंधही.
मीही एक शिंग त्यांच्यातले
तुझ्यासाठी. पण
तू तरी सांबर आहेस, की---
की तूही एक शिंगच?
शिंगांना नसते समज;
सांबरालाही हे कळत नाही
फांद्यात शिंगे घुसेपर्यंत;
शिंगांचाही नाईलाज असतो:
त्यांना दिसत नाहीत झाडे, फांद्या;
सांबरालाही स्वत:चाच वेग असहाय बनवतो;
वर तळ्यातल्या प्रतिबिंबाने केलेला असतो
त्याचा ’नार्सीसिस.’
प्रतिबिंब तळ्यात राहते;
सांबर झाडात अडकते;
तडकतात आरसेही तळ्यांचे उन्हाळ्यात.
ते असो.
तू सांबरशिंगाचा लेप लाव
आपल्या जखमेवर;
पहा, वेदना कमी झाल्या तर!