Friday, March 23, 2012

बा. भ. बोरकर -- स्वर्ग नको सुरलोक नको


स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
 
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
 
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
 
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
 
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
 
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
 
मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
 
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षॊभ हवा
 
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
 
विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
 
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा
 

Monday, March 12, 2012

गोविंदाग्रज -- प्रेम आणि मरण

कुठल्याशा जागी देख ।
मैदान मोकळे एक ॥ पसरलें ॥
वृक्ष थोर एकच त्यांत ।
वाढला पुर्या जोमांत ॥ सारखा ॥
चहुंकडेच त्याच्या भंवतें ।
गुडघाभर सारें जग तें ॥ तेथलें ॥
झुडुपेंच खुरट इवलालीं ।
मातींत पसरल्या वेली ॥ माजती ॥
रोज ती । कैक उपजती । आणखी मरती ।
नाहि त्या गणती । दादही अशांची नव्हती ॥ त्याप्रती ॥


त्यासाठी मैदानांत ।
किति वेली तळमळतात ॥ सारख्या ॥
परि कर्माचे विंदान
कांही तरि असतें आन ॥ चहुंकडे ॥
कोणत्या मुहूर्तावरतीं ।
मेघांत वीज लखलखती ॥ नाचली ॥
त्या क्षणी । त्याचिया मनीं । तरंगति झणीं।
गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ॥ न कळतां ॥


तो ठसा मनावर ठसला ।
तो घाव जिव्हारीं बसला ॥ प्रीतिचा ॥
वेड पुरें लावी त्याला ।
गगनांतिल चंचल बाला ॥ त्यावरी ॥
जतिधर्म त्याचा सुटला ।
संबंध जगाशी तुटला ॥ त्यापुढें ॥
आशाहि । कोठली कांहि । राहिली नाहिं ।
सारखा जाळी । ध्यास त्यास तीन्ही काळीं ॥ एक तो ॥


मुसळधार पाउस पडला ।
तरि कधी टवटवी त्याला ॥ येइना ॥
जरि वारा करि थैमान ।
तरि हले न याचें पान ॥ एकही ॥
कैकदा कळयाही आल्या ।
नच फुलल्या कांही केल्या ॥ परि कधी ॥
तो योग । खरा हठयोग । प्रीतिचा रोग ।
लागला ज्याला । लागतें जगावें त्याला ॥ हें असें ! ॥


ही त्याची स्थिती पाहुनिया ।
ती दीड वीतीची दुनिया ॥ बडबडे ॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव ॥ त्यास्तव ॥
कुणि दयाहि त्यावरि करिती ।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती ॥ त्याप्रती ॥
निंदिनी । कुणी त्याप्रती ॥ नजर चुकविती ।
भीतिही कोणी । जड जगास अवजड गोणी ॥ होइ तो ॥


इष्काचा जहरी प्याला ।
नशिबाला ज्याच्या आला ॥ हा असा ॥
टोंकाविण चालू मरणें ।
तें त्याचें होतें जगणें ॥ सारखें ॥
हृदयाला फसवुनि हंसणें ।
जीवाला न कळत जगणें ॥ वरिवरी ॥
पटत ना । जगीं जगपणा । त्याचिया मना ॥
भाव त्या टाकी । देवांतुनि दगडचि बाकी ॥ राहतो ॥


यापरी तपश्चर्या ती ।
किति झाली न तिला गणती ॥ राहिली ॥
इंद्राच्या इंद्रपदाला ।
थरकांप सारखा सुटला ॥ भीतिनें ॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे ।
ध्रुवबाळा मत्सर वाटे ॥ पाहुनी ॥
तों स्वतां । तपोदेवता । काल संपतां ।
प्रकटली अंती । ''वरं ब्रूहि'' झाली वदती ॥ त्याप्रती ॥


''तप फळास आलें पाही ।
माग जें मनोगत कांही ॥ यावरी ॥
हो चिरंजीव लवलाही ।
कल्पवृक्ष दुसरा होई ॥ नंदनी ॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें ।
तुज मिळेल पद भाग्याचें ॥ तरुवसा ॥''
तो वदे '' देवि सर्व-दे । हेंच एक दे - 
भेटवी मजला । जीविंच्या जिवाची बाला ॥ एकदा ॥''


सांगती हिताच्या गोष्टी ।
देवांच्या तेतिस कोटी ॥ मग तया ॥
'' ही भलती आशा बा रे ॥
सोडि तूं वेड हें सारें ॥ घातकी ॥
स्पर्शासह मरणहि आणी ।
ती तुझ्या जिवाची राणी ॥ त्या क्षणी ॥
ही अशी शुध्द राक्षसी । काय मागसी ।
माग तूं कांही । लाभलें कुणाला नाहीं ॥ जें कधी ॥''


तो हंसे जरा उपहासें ।
मग सर्वेच बदला खासें । त्यांप्रती ॥
'' निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाहि मिळतें ॥ धिक तया ॥ 
क्षण एक पुरे प्रेमाचा ।
वर्षाव पडो मरणांचा । मग पुढें ॥''
निग्रहे । वदुनि शब्द हे । अधिक आग्रहें ।
जीव आवरुनी । ध्यानस्थ बैसला फिरुनी ॥ वृक्ष तो ॥


तो निग्रह पाहुनि त्याचा ॥
निरुपाय सर्व देवांचा ॥ जाहला ॥
मग त्याला भेटायाला । 
गगनांतील चंचल बाला ॥ धाडिली ॥
धांवली उताविळ होत ।
प्रीतीची जळती ज्योत ॥ त्याकडे ॥
कडकडे । त्यावरी पडे स्पर्श जों घडे ।
वृक्ष उन्मळला । दुभंगून खाली पडला ॥ त्या क्षणीं ॥


दुभंगून खालीं पडला ।
परि पडतां पडतां हंसला ॥एकदा ॥ 
हर्षाच्या येउनि लहरी ।
फडफडुनी पानें सारी ॥ हांसली ॥ 
त्या कळया सर्वही फुलल्या ॥ 
खुलल्या त्या कायम खुलल्या ॥ अजुनिही ॥
तो योग । खरा हठयोग । प्रीतीचा रोग ।
लागला ज्याला । लाभतें मरणही त्याला ॥ हें असें ॥ 

***********

स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी 
मराठी रसिकांसाठी 'गोविंदाग्रज' पाठवी ॥

गोविंदाग्रज -- श्रीमहाराष्ट्र गीत


मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी  देशा ॥
भावभक्तिच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ॥
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा, ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचतें करीं ॥
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्यासी
वैभवासि वैराग्यासी ॥
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ 1 ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा ! महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या 'जिवलगा' महाराष्ट्र देशा ॥
पाषाणाच्या देहीं वरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा ॥
तुझिया देहीं करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ॥
मंगल वसती जनस्थानिंवी श्री रघुनाथांनी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥2॥

भिन्न वृत्तिंची भन्न भिन्न हीं एक जीवसत्त्वें ।
तुझिया देहीं प्रकट दाविती दिव्य जीवतत्त्वें ।
चित्पावन बुध्दीनें करिसी तू कर्तबगारी ।
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥
कायस्थाचें इमान फिरवी रक्ताचा फेर ।
ठाक मराठी मनभट दावी तुझें हाडपेर ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 3॥

ठायीं ठायीं पांडव लेणीं सह्याद्रीपोटी ।
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिंचाहि ।
लढवय्या झुंझार डोंगरी तूंच सख्या पाही ॥
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल ।
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 4॥

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकाेंडा ।
वहाण पायीं अंगि कांबळी उशाखालिं धोंडा ॥
विळा कोयता धरी दिंगबर दख्खनचा हात ।
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात ॥
आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल ।
तिकडे इस्तंबूल थरारे,  इकडे बंगाल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ 5 ॥

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक ।
झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ॥
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड ।
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड ॥
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा ।
कोंडाण्याचा करि सिंहगड मालुसरा तान्हा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 6 ॥

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला ।
पहिलावहिला अष्टांगांनीं प्रणाम हा त्याला ॥
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकांच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा ॥
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा ।
वाल्मिकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 7 ॥

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा ।
कवि कृष्णाच्या* निर्यमका हे महाराष्ट्र देशा ॥
*केशवसुत.
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ ।
तिथेंच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ ॥
जिथें रंगलीं साधींभोळीं जनाइचीं गाणी ।
तिथेंच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .... ॥ 8 ॥

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी ।
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी ..
तुला जागवी ऐन पहांटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ ॥
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी ।
उभा टाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥ 9 ॥

प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला ।
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला ॥
भीमथडीहुनि चहुंमुलखांवर फिरले धारकरी ॥
भीम थडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी ।
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धांव ॥
पुंडलिकांचें नांव चालवी दगडाची नाव ॥
गोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक ।
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ..... ॥ 10 ॥

(अपूर्ण )