ती -- माझी मुलगी--लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली.
माझ्या डोळ्यांपुढची सगळी वाट धुकं धुकं झाली.
तिची मांजरी, तिची पुस्तकं,तिची वाद्यं, तिची घुंगरं
लाडके कपडे आणि पत्रं, तिचे फोटो, तिची चित्रं
कुणी गात नाही, कुणी हसत नाही
सगळ्यांना जाताना ती स्टॅच्यू म्हणून गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.
इवली असल्यापासून इथं तिचच राज्य होतं.
जरा कुठं गेली कि घर कावरं बावरं होत होतं.
तिचं बोलणं, तिचं हसणं, रागानं कधी तणतण करणं,
तिचं गाणं, तिचं हसणं, मनापासून चित्र काढणं,
तिच्यामुळे आमच्या घरची मैफल रंगत गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.
आमच्या गप्पा, आमची गुपितं,आमचा स्वयंपाक, बाहेर जाणं,
आमच्या टिंगली, आमची भांडणं,चिडवाचिडवी, खरेद्या करणं,
स्वप्नं,चिंता,वैताग सांगणं, एकमेकींना घडवत रहाणं,
पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.
बावीस वर्षं मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयांत किती गोष्टी प्रेमाने शिकवत रहाते
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते.
ओझं कसलं, फुलपांखरू ते याची जाण झाली.
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.
तिच्या माझ्या धाग्यांचं एक नातं विणलं आहे.
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग घेणार आहे.
नवं नातं विणण्यांत ती आता गुंतली आहे.
त्याचे रंग सुंदर वेगळे मला कळतं आहे.
एकमेकांना दुर्मिळ झालो याची जाणीव झाली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.