Sunday, November 27, 2011

कविता महाजन -- कोण ऐकतं हाक?



कोण ऐकतं हाक?
एक चांदणी जेव्हा हाक मारते
घुसमटल्या आवाजात जीवाच्या आकांताने
तेव्हा ना काळोख ऐकतो
ना उजेड

पाहत राहतात जागणारे सारे
न ऐकता
त्यांनी ऐकलंय पिढ्यानुपिढ्या
की कोसळणार्‍या चांदणीकडे पाहून
डोळे मिटायचे आणि तिला
आपली इच्छा सांगायची...
कोसळणारी चांदणी
इच्छापूर्ती करणारी असते.

चांदणी दगड होते कोसळताना
सारं तेज लोप पावतं तिचं
जिथे कोसळते तिथे एक
विवर जन्मतं पृथ्वीवर.
विवरातल्या पाण्यात दिसत राहतात
अगणित चांदण्यांची प्रतिबिंबं.

कोण ऐकतं हाक ! ?

Thursday, November 3, 2011

सर्व सर्व विसरु दे - मंगेश पाडगांवकर

सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा

हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा

रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचांदणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा

हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा

हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना