Friday, February 10, 2012

ग्रेस -- उखाणे


ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?

दावणीस गाय
धूळ काळजाला आली
सूर्य फेकून नदीत
कुठे सांज गेली?

खांद्यावर बसे
त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच
वारियाने डोले

झाड मधे आले
होई वाट नागमोडी
उडे पोपटाचे रान
पिंजर्‍याला कडी

दगडाचा घोडा
त्याला अंधाराचे शिंग
शुभ्र हाडांनाही फुटे
कसे काळे अंग?

संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते

आम्ही भावंडेही
भय डोळी वागवितो
चांदण्यात आईसाठी
वारा दारी येतो

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?


1 comment:

  1. जाईबाई सांगा
    तुम्ही मनातले पाप
    कळ्यांचीही फुले
    कशी आपोआप?

    ReplyDelete