वामांगी
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट
मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण