Thursday, June 14, 2012

माझ्या अवजड मनाखाली : अरुणा ढेरे

तुटलेल्या संवादांचे ऒझे वागवताना
मनाला रग लागलेली
आणि आयुष्य नव्याने रंगीत करण्याची सारी निमित्ते
न परतीच्या वाटेवर उडून गेलेली.

जुन्या भरवशासारखा तू दाराशी येतोस.
नवे कोवळे मोड आलेले शब्द तुझ्याजवळ,
निष्पाप मनःपूर्वकतेने माझ्या मातीचा होतोस.

जरी तू ओलांडली नाहीस
कोणतीही न आखलेली रेषा,
तरी तुला संकोच वाटत नाही माझा,
माझ्या स्त्रीत्वाचा.
मला कळतो तुझा उदंड समर्थ स्वभाव
मोडण्याचा, निर्हेतुक घडण्याचा, सहजपणाचा

तुझ्याजवळ नसते सांत्वन,
मला देण्यासाठी कोणतेही हसरे आश्वासन नसते,
नुसता असतोस तू,
आणि मला कळते.

माझ्या अवजड मनाखाली
तुझ्या आपलेपणाची एक लहानशी कृष्णकरंगळी
हलकेच टेकलेली असते.


4 comments:

  1. नुसता असतोस तू,
    आणि मला कळते.

    माझ्या अवजड मनाखाली
    तुझ्या आपलेपणाची एक लहानशी कृष्णकरंगळी
    हलकेच टेकलेली असते.

    वा!

    ReplyDelete
  2. कृष्ण करंगळी म्हणजे?

    ReplyDelete
  3. अवघा गोवर्धन पर्वत कृष्णाने आपल्या करंगळीवर तोलून धरला, हा संदर्भ.

    ReplyDelete