Thursday, July 2, 2026

घडवीन असे मी वृत्त

 




घडवीन असे मी वृत्त 

प्राणांच्या अलगद खाली 

अन् करीन पाऊस इथला 

शब्दांच्या पूर्ण हवाली 


मावळत्या सूर्यफुलांचा 

तू गळ्यात घेशील हार 

खडकावर पडते जैसी 

अज्ञात जलाची धार 


-- ग्रेस 


घडवीन असे मी वृत्त 

प्राणांच्या अलगद खाली 

अन् करीन पाऊस इथला 

शब्दांच्या पूर्ण हवाली 


पाऊस कितीही प्रकारे वर्णन केला तरी... पाऊस म्हणजे काय? सांगणं शक्य नाही. पाऊस ही अनुभवण्याची गोष्ट आहे. पावसात भिजणं, पावसाचा आवाज, पहिल्या पावसामुळे सुटणारा मातीचा सुगंध, मातीचा होणारा मऊ गोळा, हिरवीगार होणारी सृष्टी, ओथंबून येणारे ढग,  हवेत पसरणारा ओलावा, वाहते होणारे नदी, नाले, ओहोळ, रस्ते, धुवून स्वच्छ झालेली झाडांची पाने, चमकणाऱ्या वीजा, ढगांचा गडगडाट, कुंद हवा, लागणारी हुरहूर..... काय आणि किती सांगणार?

 तरीही पाऊस उरतोच!

कवी म्हणतो आहे, मी असं वृत्त घडवीन ज्यातील शब्दांद्वारे पाऊस पूर्णच्या पूर्ण कळून येईल.

  वृत्त काय आहे? एक नियमबद्ध आराखडा, सांगाडा.... ही कारागिरी आहे.... मानवनिर्मित गोष्ट आहे.... कृत्रिम आहे.

   ते वृत्त कवी, प्राणांच्या खाली घडवणार आहे, जेणेकरून त्यात जीव यावा,  ते जिवंत व्हावं, पाऊस पेलण्याची क्षमता त्यात यावी.

कवीला हे का करायचं आहे?

कशाला पाऊस शब्दात मांडण्याच्या कसरती करत बसतोस? 

 जा आणि पावसात भिज.


कवीचं भागधेय आहे ते!

त्यातून सुटका नाही.

तो जे जे अनुभवतो, ज्या ज्या कल्पना करतो, जी काही नवी मांडणी त्याला सुचते.... जे काही त्याचं जगणं आहे.... ते शब्दात,  काव्यात रूपांतरित करणे, हेच त्याचं काम आहे.

    

    कवीला पावसाला पूर्णपणे शब्दात आणायचं आहे.


 घडवीन असे मी वृत्त 

प्राणांच्या अलगद खाली 

अन् करीन पाऊस इथला 

शब्दांच्या पूर्ण हवाली


हे केल्यावर मग?


मावळत्या सूर्यफुलांचा 

तू गळ्यात घेशील हार 

खडकावर पडते जैसी 

अज्ञात जलाची धार 


यातली ही/हा/ हे. ... " तू" कोण आहे?

सृष्टी? धरा? पाऊस? कविता? काव्यप्रतिभा? प्रेयसी? नव्याने घडवलेलं ते वृत्त?


सूर्यफुले म्हणजे सूर्यकिरणे आहेत, मावळतीची सोनेरी किरणे आहेत. 

 दिवसभर पाऊस पडून गेला आहे, तो शब्दांच्या हवालीही करून झाला आहे , पाऊस जरासा थांबला आणि ढगांआडून सूर्य बाहेर आला.

जणू वृत्त घडवण्याबद्दल हा सूर्यफुलांचा हार कवीच्या गळ्यात घातला गेला आहे.

किंवा 

  कवीच्या आयुष्याच्या मावळतीला कदाचित हे वृत्त घडवणं... झालं आहे.

  ते वृत्त हीच गळ्यातील सूर्यफुलांची माळ आहे.

 एकेक सूर्यफूल म्हणजे त्या वृत्तातील एकेक मांडणी आहे.


   " तू" म्हणजे स्वतः कवी आहे.


 मावळत्या सूर्यफुलांचा 

तू गळ्यात घेशील हार 


पावसाला पूर्णपणे शब्दात आणणं, हे तू मिरवशील.... पण लक्षात घे...



खडकावर पडते जैसी 

अज्ञात जलाची धार 

पावसाळ्यात एखाद्या खडकावर, दगडावर, एखादी पाण्याची धार पडत असेल तर ते पाणी कुठून आलं? नक्की सांगता यायचं नाही. ती जलधारा खडकावर पडते आहे, अभिषेक करते आहे, भिजवते आहे इतकंच खरं.

   कवीला सुचणं..... कवीला हे विशिष्ट वृत्त घडवता येणं, हे म्हणजे ती अज्ञात जलधारा आहे.

कवी म्हणजे तो खडक आहे.


   कवी म्हणजे खडक कसा असेल? तो निर्मिती करणारा आहे, काव्यनिर्मिती! 

  खडक कशाची निर्मिती करतो?


पाऊस मातीवर पडला तर कोंब फुटणार.


  काहीतरी हिरवं जन्माला येणार.


पण पावसाचं वर्णन केवळ "मातीवर पडणारा पाऊस "ने पूर्ण होणार नाही. ( तसं वर्णन तर अनेकांनी करून ठेवलेलं आहेच.) 

 खडकावर पडणारा, वाहून जाणारा, वर्षानुवर्षे पडला तर खडकात खळगा निर्माण करणारा पाऊस! हा ही जर शब्दात आला तरच पूर्ण पाऊस शब्दांच्या हवाली केला असं होईल ना?


म्हणून ते वृत्त हे ती जलधारा आहे, कवीवर बरसणारी!


सुरूवातीला कवी म्हणतो की मी असे असे वृत्त घडवीन.... 

त्याच्या खरंतर लक्षात आलेलं आहे की आपण केवळ तो खडक आहोत, ज्यावर ही अज्ञात जलाची धार पडते आहे.


अज्ञातातून जे जे येतं आहे..... ते ते केवळ स्विकारणं एवढंच आपण करायचं आहे.

   तो सूर्यफुलांचा हार असेल किंवा पावसाला पूर्ण करणारी एखादी अज्ञात जलधार असेल.


पाऊस म्हणजे देणं आहे.

देणाराही पाऊस आणि देणंही पाऊस 

तो जे जे देईल ते ते, तसंच्या तसं स्वीकारणं म्हणजे पाऊस घेणं आहे.

  

शब्दात पकडता येईल की नाही हा भाग अलाहिदा!


तो तसा धरता न यावा यातच गंमत आहे, तरीही तो अख्खा शब्दात मांडण्याची इच्छा धरावी हे अरभाट आहे.

   ...


विद्या कुळकर्णी 

२ जुलै २६

तळटीप - अन् करीन पाऊस इथला 

इथला म्हंटलं आहे.

"इथला" शी तुलना करता येईल असा "तिथला" ही पाऊस आहे.

  "इथला" मुक्काम संपला की तिथे जायचं आहे.

  तिथल्या पावसाचं काय करायचं? हे तिथे गेल्यावर बघू.

 इथल्या पावसाला शब्दांच्या हवाली करायचं आहे.


"इथला" या एका शब्दाने कळतंय की या कवितेचा कॅनव्हास किती मोठा आहे! 


- विद्या कुळकर्णी

Saturday, March 14, 2026

सावल्यांचे नृत्य माझ्या चांदण्यांच्या अंगणात. बा. भ. बोरकर

 सावल्यांचे नृत्य 

माझ्या चांदण्याच्या अंगणात 

घननीळ वेदनांचे 

लास्य तुझ्या गायनात !


अबोलीचा गोंड माझा 

दिसायला साधाभोळा 

पोटी परी गांठ त्याच्या 

ठावी माझ्या काळजाला 


सुरंगीच्या सुगंधाने 

डंख विसरला नाग 

रात्र ओथंबली तरी 

जाईना का तुझा राग ?


जांभ रंगा आला दारी 

तळी गुलालाची रास 

माघ मोहरला अंगी 

जरा बिलगुनी हांस 


- बा. भ. बोरकर


सावल्यांचे नृत्य माझ्या चांदण्याच्या अंगणात 

रात्री चांदण्यांच्या प्रकाशात, झाडांच्या सावल्या अंगणात पडल्या आहेत आणि वाऱ्यावर फांद्या हलल्या की अंगणातल्या सावल्या देखील हलताहेत, त्यांचं जणू नृत्य चालू आहे.


घननीळ वेदनांचे 

लास्य तुझ्या गायनात 

लास्य म्हणजे नृत्य.. तुझ्या गायनात जणू एक नृत्य आहे.

कशाचं लास्य आहे?

घननीळ वेदनांचे 

घननीळ वेदना... 


सावल्यांचे नृत्य.... म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेल्या सावल्यांचे , चांदण्या म्हणजे त्याची सर्जनशीलता, सावल्या म्हणजे त्याच्या कवी असण्यावर मोहून त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्याच्या प्रेयसी.

  त्यामुळे त्याची जी सहचरी आहे तिच्या गायनात घननीळ वेदना आहेत. 

  ती गाते तर आहेच, संसार तर चालूच आहे.

  

   अबोलीचा गोंड माझा 

दिसायला साधाभोळा 

पोटी परी गांठ त्याच्या 

ठावी माझ्या काळजाला 

ही अबोली म्हणजे सहचरी आहे. 

दिसायला साधाभोळी, सगळं समजून घेणारी, उमजून असलेली.

 अबोलीचं फूल फार दुर्मिळ नाही आणि फार वैशिष्ट्य पूर्ण नाही. त्याच्या देठाला खाली, सुरूवातीला एक फुगवटा असतो, सहज कुणाच्या लक्षात येणार नाही असा. 

तसा या अबोली ( अबोल असणारी, याही अर्थाने) च्या पोटातही गाठ आहे, कवीला ते माहित आहे. म्हणून तो बदलला का ? नाही.


सुरंगीच्या सुंगंधाने 

डंख विसरला नाग 

नागाला सुगंधी वनस्पती आवडतात आणि त्या सुगंधावर भाळून तो त्यांच्या जवळ राहतो. केवडा किंवा चंदनाच्या झाडावर साप असतात.

तसे सुरंगीच्या झाडावर देखील असतात.


डंख करणारा नाग आहे, 

त्या वेदनांचं गाणंच तर ती गाते आहे.

सुरंगी फुलली, त्याला कदाचित जुने दिवस आठवले, आपण तिला किती दुखावलं आहे, हे तो विसरला आहे. 

तिनेही ती विसरावं अशी त्याची अपेक्षा आहे.

रात्र ओथंबली तरी 

जाईना का तुझा राग 


ती विसरली नाहीये.

वरवर सगळंच तर छान चाललं आहे.

पोटी परी गांठ तिच्या 

रात्र बहरली असेल, तिचा राग जात नाहीये.


जांभ रंगा आला दारी 

तळी गुलालाची रास 

माघ मोहरला अंगी 

जरा बिलगुनी हास 


या गुलालाच्या राशीची एखादी सुखद आठवण असेल, 

त्याचं स्मरण तो तिला करून देतो आहे.

पण नाही.


ही ना प्रेमाची कविता आहे,

ना विरहाची आहे,

ना आर्जवांची आहे,

ना क्षमायाचनेची आहे,

ना चुकांच्या कबुलीची आहे,

एखाद्या वास्तव कादंबरी सारखी ही कविता आहे.

दोघांमधलं अंतर स्पष्ट दिसतं आहे.

कितीतरी दिवसांनी त्याला काहीतरी वाटलं आहे.... त्यात उत्कटता नाही. 

वाटून गेल्याची नुसती नोंद आहे.


एक उदासी पसरली आहे.

जी आपल्याला अस्वस्थ करते.

आपल्याला याचंही पटतं, तिचंही पटतं.

आपण नुसते साक्षीदार.


कवितेची शब्दकळा बोरकरांची, ओळखीची आहे, त्यातली भावना सहसा बोरकरांच्या कवितेत न भेटणारी.


- विद्या कुळकर्णी 

- १२ मार्च २५

Wednesday, February 18, 2026

मर्ढेकर - शिशिरागम

शिशिरागम

 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
 एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें! 

 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 

 - बा. सी. मर्ढेकर 

 शिशिर ऋतू आहे आणि पानगळ सुरू झाली आहे... यावेळी ही कविता आठवतेच आठवते. 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
  एकेक पान आहे. इथे प्रत्येक पान महत्त्वाचं आहे हे कळतं आणि एकेक मधे ती गळण्याची संथ गती आहे. 
 उगाच रडावया.. 
 असं एकेक पान गळत असता उगाच रडायला येतं. कळतही नाही, का ते! 
 पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें 
 रडायला येण्याचं एक कारण आहे हे! 
पाखरं कशी आहेत? इवली आणि सुकोमल 
 जातील सांग अता कुठे? इथे आपल्याला कळतं की हे कुणाशी तरी बोलणं चाललेलं आहे. कोण आहे ती? 
 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 जेव्हा इथे पानगळ होते आहे तेव्हा तिच्या बागेत बकूळ... बकुलावली असं म्हटलं आहे. तिच्या बागेतल्या झाडालाही असं एक आवडीचं नाव दिलेलं आहे, फुलली आहे. शिशिर ऋतू ने बकुलावली ला फुलवलं आहे आणि बाकी कविच्या बागेतल्या झाडांची पाने त्यामुळे गळताहेत. 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 आता थोडं हायसं वाटतं आहे की कुठेतरी या पाखरांना जायला जागा आहे. 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 
सुहास ही कवीची प्रेयसी आहे, तिच्याशी मागे कधीतरी, वियोगाच्या वेळी बोलणं झालं आहे, तेव्हाची तिची आसवे आठवून, तिच्या प्रेमाची खात्री असल्याने, कवी तिला विचारतो आहे की तूच आता सांग.. शिशिर ऋतू त एकेक पान गळायला लागलं की मला असं का होतं? माझ्या पेक्षा तू मला जास्त ओळखतेस तूच सांग.
 हा एक साधा कळणारा अर्थाचा वरचा थर आहे. 
 त्याच्या आतला थर कुठला? शिशिर ऋतू म्हणजे काय? हे पानगळ होणारं झाड कुठलं? शिशिर म्हणजे नैराश्य, उदासपणाचा मनाचा ऋतू आहे. झाड हे मन आहे. बाहेर शिशिर असेल तेव्हा आतल्या शिशिराची आठवण येते आणि आतला शिशिर सुरू झाला की बाहेरचा शिशिर आठवतो असंही आहे. 
 पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे स्वप्नं आहेत.. दोघांनी मिळून पाहिलेली. मनाच्या शिशिर ऋतूत असं होतं की ती स्वप्नं सांभाळता येत नाहीत. बकूळ मात्र सदाहरित, पानांनी गच्च भरलेला, सुगंधी फुले असणारा आहे, त्याच्यावर शिशिराचा अंमल चालत नाही. अशा वेळी ती इवली सुकोमल स्वप्नं ती सहज सांभाळते. ....... जरि लागले एकेक पान गळावया यातला महत्त्वाचा शब्द आहे, पुनरागमे शिशिरर्तुच्या पुनरागमे हा पुन्हा आलेला शिशिर आहे, तो ही ग्वाही देतो की तो पुन्हा जाणारही आहे आणि वसंत येणार आहे. 
 कविता नुसती एक घटना, मनातली हालचाल, एक गोष्ट सांगणारी नसते. कवितेत हे महत्त्वाचं असतं की ती कशी सांगितली आहे? कवितेचा घाट, लय आणि शब्दांची निवड! त्याने काय होतं की अर्थ नाही कळला तरी ती कविता सारखी सारखी आठवते, म्हणावीशी वाटते. अशी म्हणत असता तिचा अर्थही न कळता, कळल्यासारखा वाटायला लागतो. किंबहुना जे शब्दात मांडताच येणार नाही तेही कळल्यासारखं होतं, ती वाचताना थेट अनुभव देते....
 शिशिरर्तुच्या पुनरागमे... 
एकेक पान गळावया... 
कां लागता मज येतसे... 
नकळे उगाच रडावया....
 ती उदासी, ते रडायला येतसं होणं.... व्हायला लागतं. 
 खरं म्हणजे चांगल्या कवितेला ज्याचं त्यानं भिडावं हेच खरं.... नंतर त्यावर काही बोलू नये.... त्या कवितेत राहावं... 

 -- विद्या कुळकर्णी 
  २८ फेब्रुवारी २३