Monday, January 31, 2022

देवा तुझे किती

 देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो


सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे


सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती


सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी


इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील


-- ग. ह. पाटील


ही कविता आमच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात नव्हती. जुन्या पुस्तकात होती. त्याची पाने पिवळी पडलेली होती आणि जाड काळ्या ठशात ही कविता छापलेली होती.

 ही कविता सुंदर आहे. ती पहिल्यांदा शाळेत म्हंटली आणि नंतर घरी येऊन त्या पुस्तकात वाचल्यावर खजिना सापडल्याचा आनंद झालेला माझा चेहरा मला आठवतोय.

 ही साधी सोपी कविता आहे.

हे सरळ , साधेपण फार लाघवी आहे.

  ही कविता माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी देव म्हणजे देवघरातला, संस्कृत स्तोत्रांमधला, संस्कृतप्रचुर मराठी श्लोक आणि आरत्यांमधला असा होता. सोवळ्यातला... अंतरावरचा...

 या कवितेत तर तो थेट असा माझ्या भाषेत माझ्यासमोर आला.

 ही देवाची स्तुती/ आराधना नाहीये. थेट देवाशी बोलणंच आहे. साधं... थेट!

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

आणि कल्पना ताणून, काही समजून घ्यायचं, असंही नाही.

ही कविता भेटल्यावर मी पुन्हा आकाशाकडे पाहिलं, खरंच की! किती सुंदर आहे!! निळा/आकाशी हा माझा आवडता रंग!

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे

आधीचं दिवसाचं वर्णन आहे, हे रात्रीचं...

सुंदर मी झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती

सोपं, कळेलसं, लहान मुलांच्या अनुभवविश्वातलं...

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

आम्ही तुझी मुले आहोत हे सांगणं किती गोड आहे.


पुढचं कडवं जरा वेगळं आहे. तेव्हा मी याचा कधी विचारच केला नव्हता. 

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील

या ओळींनी आधी मी चकीत झाले, देवाबद्दल मी काहीच कसा विचार केलेला नाही? आणि मग मला पटलं. खरंच की!

या ओळींनी माझ्या मनातला देव सुंदर केला!!

 

मी या कवितेची ऋणी आहे.


ही कविता कधीही वाचली/ ऐकली की ते जुनं 'निरागसपण' सोबत घेऊन येते. आनंद घेऊन येते.


-- विद्या कुळकर्णी

माझ्या आनंदलोकात

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून

-- कुसुमाग्रज

ही कविता माझ्या माहितीप्रमाणे प्रथम "आनंद" या नाटकात  लिहीलेली आहे.
 आनंद हे नाटक शिरवाडकरांनी " आनंद" या सिनेमावरून लिहीलेलं आहे.
 
 त्यातलं मुख्य पात्र आनंद आहे. ते आपण ओळखतोच.

या आनंद चा एक "आनंदलोक" आहे.
 त्याचं स्वतः चं जग!
आणखी एका कवितेत तो म्हणतो तसं..
 *माझी एक खाजगी पृथ्वी असते माताजी!*
  
 हा " आनंदलोक" कसा आहे?
माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही
सगळ्यात महत्त्वाचं हा "माझा" आनंदलोक आहे. :)
 इथे चंद्र मावळत नाही. 
ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही, असं होतं.
तसा हा आनंदलोक आहे, जिथे चंद्र मावळत नाही, इथे शीतलता कायम आहे. इथे दर्या जो आहे तो प्रेमाचा आहे आणि दर्यावर येणाऱ्या लाटा निर्माण करणारा चंद्र कधी मावळत नाही. या सागरात लाटा येतात , आवेग आहेत पण वादळ नाही.अविश्वास नाही.
  
 माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर
 इथे चंद्र कायम आहे, वसंत ऋतूने इथे घर केलं आहे. इथे ऋतू बदल नाहीत. वसंत हा उत्सवाचा ऋतू आहे. इथे तो चालूच आहे. आंब्याने फळ धरलं आहे आणि त्यावर बसून कोकीळा/कोकीळ गाताहेत.
  इथे काळ एका "आनंदी" बिंदूवर येऊन स्थिर झाला आहे.
 सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून
इथे सात रंग म्हणजे केवळ " रंग" नाहीत तर विविध कला, सूर, लेखन, नृत्य, गायन असं सगळं आहे, त्यांची मैफल जमलेली आहे. ती मैफल हवेतच आहे, तिचं अस्तित्व हवेसारखं ठायी ठायी आहे.
  मरण पुढ्यात आहे, तेही सुंदर आहे, ते नाचतं आहे, तेही मोहक आहे, रंगीबेरंगी आहे.
 या आनंदलोकाचा भागच आहे ते!
 आनंदलोक असा ( वर वर्णन केलं आहे तसा) का आहे?
 याचं उत्तर या शेवटच्या ओळीत आहे.
 कारण इथे मृत्यूची भीती नाही, मृत्यूचं अस्तित्व स्विकारलं आहे आणि त्याचं सौंदर्य बघण्याची दृष्टी "आनंद" मधे आहे. म्हणून त्याचा "आनंदलोक" प्रेमात न्हाऊन निघणारा आहे.
 त्याच्या आत हा आनंदलोक आहे म्हणून तो बाहेर आनंदी आहे.
  आपण आपल्या आत ज्या ग्रहावर राहतो, जी आपली आतली भूमी आहे, ती कशी आहे? तिथलं पाणी कसं आहे? तिथली हिरवळ कशी आहे? तिथलं इंद्रधनुष्य कसं आहे? यावर आपण बाहेरच्या जगात कसे असतो, हे ठरतं.
 त्यासाठी आपापला आतला प्रदेश शोधला पाहिजे, त्याची निगराणी केली पाहिजे.
 
   इथे आनंद स्वतः ची ओळख करून देतो आहे. 

 खूप सुंदर कविता

-- विद्या कुळकर्णी