Monday, January 31, 2022

देवा तुझे किती

 देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो


सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे


सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती


सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी


इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील


-- ग. ह. पाटील


ही कविता आमच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात नव्हती. जुन्या पुस्तकात होती. त्याची पाने पिवळी पडलेली होती आणि जाड काळ्या ठशात ही कविता छापलेली होती.

 ही कविता सुंदर आहे. ती पहिल्यांदा शाळेत म्हंटली आणि नंतर घरी येऊन त्या पुस्तकात वाचल्यावर खजिना सापडल्याचा आनंद झालेला माझा चेहरा मला आठवतोय.

 ही साधी सोपी कविता आहे.

हे सरळ , साधेपण फार लाघवी आहे.

  ही कविता माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी देव म्हणजे देवघरातला, संस्कृत स्तोत्रांमधला, संस्कृतप्रचुर मराठी श्लोक आणि आरत्यांमधला असा होता. सोवळ्यातला... अंतरावरचा...

 या कवितेत तर तो थेट असा माझ्या भाषेत माझ्यासमोर आला.

 ही देवाची स्तुती/ आराधना नाहीये. थेट देवाशी बोलणंच आहे. साधं... थेट!

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

आणि कल्पना ताणून, काही समजून घ्यायचं, असंही नाही.

ही कविता भेटल्यावर मी पुन्हा आकाशाकडे पाहिलं, खरंच की! किती सुंदर आहे!! निळा/आकाशी हा माझा आवडता रंग!

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे

आधीचं दिवसाचं वर्णन आहे, हे रात्रीचं...

सुंदर मी झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती

सोपं, कळेलसं, लहान मुलांच्या अनुभवविश्वातलं...

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

आम्ही तुझी मुले आहोत हे सांगणं किती गोड आहे.


पुढचं कडवं जरा वेगळं आहे. तेव्हा मी याचा कधी विचारच केला नव्हता. 

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील

या ओळींनी आधी मी चकीत झाले, देवाबद्दल मी काहीच कसा विचार केलेला नाही? आणि मग मला पटलं. खरंच की!

या ओळींनी माझ्या मनातला देव सुंदर केला!!

 

मी या कवितेची ऋणी आहे.


ही कविता कधीही वाचली/ ऐकली की ते जुनं 'निरागसपण' सोबत घेऊन येते. आनंद घेऊन येते.


-- विद्या कुळकर्णी

No comments:

Post a Comment