चित्रवीणा
निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखासवे होऊनी अनावर
तारांमधला पतंग कोठे
भुलूनि गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला
उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले
कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे
फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे
कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे
घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजूनि करते दिडदा दिडदा
-- बा. भ. बोरकर
ही बोरकरांची एक चित्रदर्शी सुंदर कविता आहे.
ही निसर्गदृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात.
चित्रात विविध रंग आहेत,
" निळ्या जळावर कमान काळी"
ही ताजी, नुकती काढलेली ओली चित्रे आहेत.
दिडदा दिडदा चा, रेल्वेच्या चाकांचा एक ठेका असतो तसा या कवितेला आहे, त्या तालावर ही चित्रे सरकताहेत.
रेल्वेतून उतरल्यावर देखील काही काळ आपण रेल्वेतच आहोत असा भास होत राहतो, तसं ही कविता वाचून झाल्यावर देखील ही चित्रे डोळ्यासमोर तरळत राहतात.
काही चित्रे फारच सुंदर आहेत.
" कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे"
बकरीची पोरे आहेत ती!
कोकरं नव्हे !
ती चपळही आहेत आणि धीटही आहेत. 😊
" एक त्यातले लुचे आईला
सटीन कांती गोरे गोरे"
एक त्यातलं कसं आहे?
सटीन कांती... सॅटीन चं कापड असतं ना चमकदार आणि स्पर्शाला मऊ... तसं.
बघा हं, या कवितेत काय काय आहे?
रंग आणि दृश्य आहे... डोळ्यांना
दिडदा दिडदा ... नाद आहे.. कानांना
कुठे आवळीवरी... आवळा... चव
सटीन कांती... स्पर्श
जितक्या जास्त ज्ञानेंद्रियांनी आपण एखादा अनुभव घेऊ तितका तो खोल आणि परिपूर्ण असतो.
" उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे"
म्हशींची न हलता स्थिर राहण्याची क्षमता कमाल असते, पाण्यात डुंबणाऱ्या म्हशी काहीवेळ पुतळा भासतात. किंचित थरथरल्या की जिवंत होतात.
म्हशी गोठल्या आहेत आणि काळे कातळही स्थिर म्हशींप्रमाणे भासताहेत! कातळ थरथरल्या चा भास होतोय का??
* वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओले ओले *
तृप्तीचा वर्ख आहे, वर्खात तालेवारपण आहे. ही तृप्तता बघून कातळ सुद्धा ओले झाले आहेत. नुसते ओले नाहीत तर ओले ओले....एक नाद आहे.. तरलता आहे...रमणं आहे... शिवाय इथे सगळंच +१ आहे... भरून वाहतं आहे.
कविता वाचताना, आठवताना इथे क्षणभर थांबून ती तृप्ती डोळे मिटून अनुभवायची आहे.
" तारांमधला पतंग कोठे
भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे
अस्तरवीच्या कवचकुंडला"
ही हलती चित्रे आहेत, पतंग वाऱ्याने हलतो आहे.
शिवाय इथे बघा, चित्राचा ॲंगल दिला आहे.
मला सगळ्यात आवडणारं चित्र आहे....
*जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होऊनी अनावर*
अर्थातच ही पावसाळा सुरू होऊन काही दिवस झाल्यानंतरची दृश्ये आहेत.
सगळीकडे गवत पसरलं आहे, ते बागडतं आहे.
लक्षात घ्या, ते चालत नाहीये, उड्या मारत नाहीये, नाचत नाहीये, बागडतं आहे. हे इतकं गोड क्रियापद आहे, दुसरं कुठलं इथे चाललंच नसतं.
बागडण्यात काय आहे? आनंदाने मनासारखं फिरणं आहे, कधी चालत, कधी उड्या मारत, कधी नाचत, कधी जरा थांबून असणं आहे.
इथे बालकवींच्या श्रावणमासी ची आठवण होते
" सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती"
बागडण्यात नियमही नाहीत आणि भयही नाही.
तर असं हे गवत...
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
बागडत असताना ते कुठे भिंतीवरही उगवलं आहे.
बोरकरांनी काय म्हंटलं आहे की भिंतीच्या कडेवर चढलं आहे.
किती गोड!
भिंतीची इच्छा आहे म्हणून ते कडेवर चढलं आहे केवळ त्याला चढावं वाटलं/ उगवायचं होतं, म्हणून नाही. भितींचं आणि त्याचं प्रेमाचं नातं आहे.
आई गं!!! या पुढच्या ओळी तर काय आहेत!!!!
*ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होऊनी अनावर*
ती भिंत म्हातारी आहे, तिचं वय झालंय, ती थरथरते आहे, ते केवळ वयाने नाही! नातवंडं अंगाखांद्यावर खेळताहेत याचं तिला सुख आहे.
अनावर होणं हे तरुणपणाचं लक्षण आहे, तिचं वय कमी झालंय. ती गदगदली आहे. त्या भिंतींचं हलणं हे तिच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.
वाऱ्याने हलणारं गवत आणि खिळखिळी झालेली भिंत यांचा हा एकत्रित परिणाम आहे.
नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणारी, वय विसरून गेलेली, आनंदाने कापरं भरलेली आजी हे किती मोहक चित्र आहे!!! इथेही वर्ख तृप्तीचा आहे!!
भिंतींचं इतकं सुंदर वर्णन मी कुठे वाचलेलं नाही.
सुनीताबाईंच्या आजीची अळंब्यांनी भरलेली भिंत आहे... पण यानंतर!!
इतक्या कमी शब्दात , इतकं परिपूर्ण " आजीपणाचं" वर्णन करून बोरकरांनी सगळ्या आज्यांना कायमचं ऋणी करून ठेवलेलं आहे.
ही शांतपणे अनुभवायची कविता आहे. ही कविता वाचणं म्हणजे एक हे मेडिटेशन आहे.... कवितेत शिरलात की तंद्री लागते.....
त्यातल्या नादाची, रंगांची, शब्दांची झिंग चढते.
तशी साधी कविता आहे.
तुमची तयारी असेल आणि तुम्ही तिचं बोट धरलंत तर तुम्ही कवितेतून बागडायला लागता आणि तीही तुमच्या कडेवर चढते.
-- विद्या कुळकर्णी
किती छान लिहिलं आहे
ReplyDeleteसुंदर!!
ReplyDelete