Wednesday, March 6, 2013

बोरकर : इतुक्या लौकर येइं न मरणा

इतुक्या लौकर येइं मरणा
मज अनुभवुं दे या सुखक्षणां!

फिरुन पहाटे डोंगरमाथा
घ्यावे काजू येतिल हाता
किंवा पोफळी शिंपुनि दमतां
मज आलिंगू दे रविकिरणां

वझर्‍यावरती न्हाउनि पाणी
गावी मी कुणबाऊ गाणी
पोवलींतुनी पेज पिऊनी
झोपुनी जरा सुखवुं दे मना
निसर्ग गो-वत्सांशि रमावें
दिवसभरी श्रम करित रहावें
मासळीचा सेवित स्वाद दुणा

पडत्या किंवा सायंकाळी
गुंतावे भावांच्या जाळी
वेणुस्वरांची काढीत आळी
मज उकलूं दे आंतील खुणा

रेंदेराचे ऐकत गान
भानहीन मज मोडुनि मान
चुडताच्या शेजेवर पडुन
भोगुं दे मूक निस्तब्धपणा

रात्री समईशी वाचावी
ज्ञानोबाची अमृत-ओवी
कविता-स्नेहें वात जळावी
उजळीत मनाचा द्वैतपणा

कुळागराची गर्द साउली
त्यांतच माझी खोप सानुली
निद्रेविण स्वप्नांच्या ओळी
रेखीत भोगु दे सरळपणा

फूलपांखरे अनंत माझी
बनुनी, मी सेवावी ताजीं
हृत्सुमनें आनंदामाजीं
नाचवीत पांथांच्या नयनां

3 comments:

  1. सुरेख!! रेंदेराचे म्हणजे रातकिड्यांचे का?

    ReplyDelete
    Replies
    1. रेंदेरा हा युरोपियन (पोर्तुगीज) गायनप्रकार आहे ..

      Delete
  2. रेंदेर हे आपल्या वासुदेवासारखे गात येणारे
    फिरस्ते असतात.

    ReplyDelete