Friday, November 18, 2022

झाड लागले मोहरू - शंकर रामाणी

झाड लागले मोहरू...


पैस आलिये माहेरा

फुले आकाशमोगरा.

देह अवघाचि दर्वळ

भरून ओसंडे ओंजळ.

शुभ्र तितुकेच झेलू

सारे अवकाश तोलू 

झाड प्राणांचे लेकरू

पायी पैलाचे घुंगरू.

-------------------------------

झाड लागले मोहरू... म्हणजे आतलं कवितेचं झाड मोहरायला लागलं आहे.... कविता होण्याच्या प्रक्रियेची ही कविता आहे.

 झाड अजून मोहरलं नाहीये, मोहरू लागलं आहे.... या प्रक्रियेत कवी आपल्याला सामावून घेतो आहे.... We are honoured.... ही श्रीमंती आहे.... हळूवारपणे या, हे मोहरणं अनुभवूया.

पैस आलिये माहेरा

फुले आकाशमोगरा

पैस आलिये माहेरा... पैसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. खांबाला टेकले आणि सुचत गेलं... तो प्रतिकात्मकरित्या सुचण्याचा, प्रतिभेचा खांब आहे.

हे सुचणं, ही प्रतिभा माहेरी आली आहे. म्हणजे काय? प्रतिभेची/सुचण्याची अनेकानेक कामं कवी करतो, प्रतिभेचं मूळ घर, खरं काम काय आहे? तर कविता करणं... दुसरी कुठली कुठली छोटी मोठी, रोजीरोटी साठीची, संसाराची, जबाबदाऱ्यांची काम करत राहणारी प्रतिभा, ... ही तिच्या माहेरी आली आहे. 

त्यामुळे काय झालंय की कवितेचा आकाशमोगरा फुलला आहे. या फुलांना गुंफून कवी कविता घडवेल.

देह अवघाचि दर्वळ

भरून ओसंडे ओंजळ

 जेव्हा हे कवितेचं झाड आत फुललं आहे तेव्हा अवघा देह दरवळून गेला आहे. खरं म्हणजे देह हा दर्वळ झाला आहे. सुगंध दरवळणे आणि आपण तो अनुभवणे वेगळं.... तो दरवळ आपण होणे वेगळं.... कसलं अलवार आहे हे!

 आतमधे असा कवितेचा आकाशमोगरा जेव्हा फुलतो तेव्हा देह दरवळ होऊन जातो.... .......

 कवीला आजूबाजूचं भान नाही.. तो हलका आणि सुगंधी झाला आहे, त्याचा शारीर अनुभव तो घेतोय... इतका तो कवितेत.... कविता घडवण्यात... तिला जन्माला घालण्यात मग्न आहे.

 भरून ओसंडे ओंजळ... अशा वेळी त्या आकाशमोगऱ्याच्या फुलांनी आणि गंधानेही ओंजळ भरुन/ ओसंडून वाहते आहे.

शुभ्र तितुकेच झेलू

सारे अवकाश तोलू

ही कविता घडवताना मग ... शुभ्र तितुकेच झेलू.... त्या फुलांमधली शुभ्र फुलं तेवढी घ्यायची... कवितेसाठी... शुभ्र ते ते शब्द घेऊ.

 इथे झेलू आहे हं! वेचू नाही.

वेचायची फुले ही जमिनीवर पडलेली असतात मग ती आपण वेचतो.

इथे फुल गळलं की झेलणं आहे.... ही कविता अशी वाहती आहे.... वर्तमानातली आहे..... प्रक्रिया आहे.... घडते आहे....

सारे अवकाश तोलू.... कवितेतील शब्दांनी सारं अवकाश... कवितेचं अवकाश... तोलून धरू... तोलणं हे देखील .... चालू वर्तमानकाळ...

झाड प्राणांचे लेकरू

पायी पैलाचे घुंगरू

हे जे कवितेचं, आकाशमोगऱ्याचं झाड आहे.... ते प्राणांचं लेकरू आहे.

 म्हणजे? कुणीतरी आपल्या जीवाच्या जवळचं असतं, आवडतं असतं.... हे त्यापेक्षा धगधगतं आहे... जीव या शब्दापेक्षा प्राण हा प्रखर शब्द आहे.... पुन्हा शुभ्र तितुकेच झेलू.... प्राणांचं लेकरू म्हणजे प्राण गुंतलेला.. जसा लेकरात असतो आणि त्यापेक्षाही ही कवितेच्या जन्माची प्रक्रिया आहे... आणि प्रतिभेने हा जीव जन्माला घातला आहे, म्हणून लेकरू.... काव्यप्रतिभा ही कवीचे प्राण! कविता हे तिचं लेकरू !

 झाड प्राणांचे लेकरू

 पायी पैलाचे घुंगरू

या लेकराच्या पायात पैलाचे घुंगरू आहेत.

 पैल..... जे ऐल नाही ते पैल...

जे शब्दात धरता येत नाही ते शब्दांच्या पैल

 या घुंगरांचा नाद या कवितेला आहे.

  -- विद्या कुळकर्णी



Saturday, April 30, 2022

हे एक झाड आहे - शांता शेळके

 हे एक झाड आहे

हे एक झाड आहे याचे माझे नाते

वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते


मला आवडतो याच्या फुलांचा वास

वासामधून उमटणारे जाणिवओले भास


पहिल्यानेच याची मोहरताना फांदी

ठेवली होती बालगाणी याच्या कटीखांदि


मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती

याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती


ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल

रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल


कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन

पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

-- शांता शेळके


हे एक झाड आहे याचे माझे नाते

वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते

कवयित्री या झाडाची आपल्याला ओळख करून देते आहे.

 हे एक झाड आहे.

कुठलं? फळाचं? फुलाचं? सावलीचं? नाव काय? ती काही सांगत नाही.

 ती सांगते, ' वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते.' 

 यात ती जवळीक दाखवते आहे. 

 ते कुठलं झाड आहे? हे महत्त्वाचं नाही, ते माझ्या जवळचं आहे, माझ्या अंगणातलं, माझ्या खिडकीतून दिसणारं, माझं. 


मला आवडतो याच्या फुलांचा वास

वासामधून उमटणारे जाणिवओले भास

इथे ती आणखी थोडी अधिक ओळख करून देते आहे.

 फुलांचा वास तिला आवडतो.

 वासामधून उमटणारे जाणिवओले भास

वास तिला आवडतो कारण तो तिला आवडणारे भास निर्माण करतो. ते भास कसे आहेत? जाणिवओले.... हा वास ओल्या - सुगंधी स्मृती जाग्या करतो. जणू ते आत्ताच घडतं आहे, असा भास होतो.

 इथे आपल्याला कळतं की झाडाशी अजून वेगळ्या पातळीवरचं नातं आहे. या नात्यात अजून कुणीतरी आहे, सुगंधी स्मृती निर्माण करणारं कुणीतरी... माणूस अथवा साहित्य/ कविता अथवा दोन्ही


पहिल्यानेच याची मोहरताना फांदी

ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि

त्या सुगंधी स्मृतीतील एक ही आहे.

यात कवयित्रीचं आणि झाडाचं दोघांचंही मोहरणं आहे.


मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती

याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

आता या ओळीत हे नातं किती गहिरं आहे ते कवयित्री सांगते आहे.

 एक वर्तुळ आहे, मातीपासून मातीपर्यंत

ते तर आपलं निसर्गाशी असलेलं नातं आहे. सगळ्याचं वनस्पती सृष्टीशी असलेलं. सगळे मातीत मिसळून जाणार आणि मातीतच जन्म घेणार..‌. मग खास या झाडाशी काय?

   झाडाची मी

मी झाडाची आहे, खास या झाडाची/ एकूणात झाडांची असंही.... म्हणजे झाडांवर / झाडं हे आपलं अन्न आहे... आपण जगतो, झाडांमुळे जगतो, झाडांचे बनलेले असतो.

 पण मी या झाडाची कुणीतरी आहे खास! ते माझ्यासाठी फुलतं, माझ्या आवडीच्या सुगंधाने मोहरतं असं

 आणि माझी ओळख काय? तर या झाडाची मी... "माझं झाड" यात कसं आहे? माझ्या मालकीचं, अगदी मालकीचं म्हंटलं नाही तरी "मी" महत्त्वाची मग "माझं" झाड. तसं नसून झाड महत्वाचं आहे, मी त्याची.

 किती गोड आणि किती खोल...

याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती

हातावरच्या रेषा नशीब सांगतात, भविष्य सांगतात, आमचं नशीब एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. सारखंच आहे. मी इथे टेबलाशी कविता लिहीत बसेन, ते खिडकीतून डोकावून बघत असेन, मोहरलेलं, वाऱ्याची झुळूक त्याच्याकडून माझ्याकडे येत आम्हां दोघांनांही सुखावेल. माझं काय  चालतं? कविता .... मनात आणि जनात याला ठाऊक.... त्याचं काय चालतं? मोहरणं... पक्ष्यांची ये जा .... मला ठाऊक.


ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल

रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

किती वर्षांचं आमचं नातं, किती जुनं, आता झाडाचं वय झालं आहे. की माझं वय झालंय?

मुळं सैल झाली आहेत.

दोघांचीही

झाडाच्या सोबतीने मी "झाड होणं" शिकले आहे.

" झाड असणं" म्हणजे काय? तर औदार्य, दातृत्व, प्रेमळपण, ठामपणे उभं राहणं, दगड मारणाराला आणि पाणी घालणाराला... दोघांनांही सावली देणं! .... मी झाड होत चालले आहे.... झाड माझ्यात रुजतंय... रूजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल.... 

 सगळ्यात जवळचं नातं कुठलं? तर रक्ताचं ... असं मानलं जातं. झाडाशी माझं नातं त्यापलिकडचं, त्याहून अधिक आहे.

 झाडाशी  एकूणच निसर्गाशी मी खूप... आतून अशी जोडलेली आहे.

  हे झाड त्याचं प्रतिकच आहे.


कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन

पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन


...........................

......................

...

काही ओळी उलगडून नाही दाखवू. 


-- विद्या कुळकर्णी

Thursday, February 3, 2022

आठवणीतील चंद्रकळेचा

 चंद्रकळा


आठवणीतील चंद्रकळेचा

गर्भरेशमी पोत मऊ

गर्भरेशमी पदारापोटी

सागरगोटे नऊखऊ


आठवणीतील चंद्रकळेवर

तिळगूळनक्षी शुभ्र खडी

कल्पनेत मी हलक्या हाती

उकलून बघते घडी घडी


आठवणीतील चंद्रकळेचा

हवाहवासा वास नवा

स्मरणानेही अवतीभवती

पुन्हा झुळझुळे तरुण हवा! 


आठवणीतील चंद्रकळेच्या

पदराआडून खुसूखुसू

जरा लाजरे,जरा खोडकर

पुन्हा उमटते गोड हसू.


आठवणीतील चंद्रकळेवर

हळदीकुंकू डाग पडे

संक्रांतीचे वाण घ्यावया

पदर होतसे सहज पुढे


 

~  शान्ता शेळके


तिळगूळनक्षी !! काय मस्त!! 


ही आठवणीतील चंद्रकळाच आहे का फक्त?

हे आठवणीतलं तरुणपण आहे.


संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसायची असते, विशेषत त्यावर पांढरी खडी असणारी!!!

 या दिवशी चंद्रकळेचं महत्त्व आहे.

 तेही लग्नानंतरची पहिली संक्रांत!


ती कवयित्री ला आठवते आहे.

बालपण/कुमारवय संपता संपता लग्न झालं आहे.

 जीव अजून सागरगोट्यात गुंतलेला आहे.

 शेवटचा सागरगोटा झेलायचा तो नऊखऊ म्हणत. जिंकल्याचा आनंद! डाव पूर्ण झाल्याचा आनंद! 

 नऊवार चंद्रकळेची घडी उलगडत जेंव्हा पदरापाशी येतो तर पदर इतका सुंदर आहे... जणू सागरगोटे नऊखऊ!!!

  आठवणीतल्या चंद्रकळेचं हे दिसणं झालं! वास? तोही जणू अवतीभवती तरूण हवा , असावी असा आहे!!

  हवेला का कुठं वय असतं!? आपलं वय ते हवेचं वय!!

 ती हवा जोडलेलीच आहे चंद्रकळेशी तेव्हाचं ते हसणं, लाजणं, खोडकरपणा... पदराशी खेळत तर ते सगळं होतं.


 संक्रांती दिवशी चंद्रकळा नेसून हळदीकुंकवाला गेल्यावर वाण घ्यायला पदर पुढे केला, तसाच करायचा असतो, सवाष्ण बायकांनी!!!

ते हळदी चे कुंकवाचे डाग पदरावर पडले आहेत.


 कवयित्री आत्ता ही चंद्रकळा उलगडून पाहते आहे का? हातात घेऊन, किंवा खांद्यावरून पदर घेऊन बसली आहे का? नाही.

 गोष्टीत गोष्ट असावी तशी ही ते आठवणीत घेऊन बसली आहे.


 गोष्टी इतक्या जुन्या आहेत की त्या सगळ्याच्या आता आठवणीच उरल्या आहेत.


 शेवटच्या ओळीत एक चटका बसतो, वाटतं.... हीचं हळदीकुंकवाशी असणारं नातं संपलं आहे का?

असावं.


 ही कवयित्री इतकी जुनी आहे की तेही सगळं वाहून गेलं आहे.


एक सुरूकुतलेलं, जग पाहिलेलं, तरी आनंदी म्हातारपण आणि त्या म्हातरपणाला आठवणाऱ्या तरुणपणाची एक ताजी गोष्ट!


खूप सुंदर


-- विद्या कुळकर्णी

Monday, January 31, 2022

देवा तुझे किती

 देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो


सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे


सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती


सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी


इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील


-- ग. ह. पाटील


ही कविता आमच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात नव्हती. जुन्या पुस्तकात होती. त्याची पाने पिवळी पडलेली होती आणि जाड काळ्या ठशात ही कविता छापलेली होती.

 ही कविता सुंदर आहे. ती पहिल्यांदा शाळेत म्हंटली आणि नंतर घरी येऊन त्या पुस्तकात वाचल्यावर खजिना सापडल्याचा आनंद झालेला माझा चेहरा मला आठवतोय.

 ही साधी सोपी कविता आहे.

हे सरळ , साधेपण फार लाघवी आहे.

  ही कविता माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी देव म्हणजे देवघरातला, संस्कृत स्तोत्रांमधला, संस्कृतप्रचुर मराठी श्लोक आणि आरत्यांमधला असा होता. सोवळ्यातला... अंतरावरचा...

 या कवितेत तर तो थेट असा माझ्या भाषेत माझ्यासमोर आला.

 ही देवाची स्तुती/ आराधना नाहीये. थेट देवाशी बोलणंच आहे. साधं... थेट!

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

आणि कल्पना ताणून, काही समजून घ्यायचं, असंही नाही.

ही कविता भेटल्यावर मी पुन्हा आकाशाकडे पाहिलं, खरंच की! किती सुंदर आहे!! निळा/आकाशी हा माझा आवडता रंग!

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे

आधीचं दिवसाचं वर्णन आहे, हे रात्रीचं...

सुंदर मी झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती

सोपं, कळेलसं, लहान मुलांच्या अनुभवविश्वातलं...

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

आम्ही तुझी मुले आहोत हे सांगणं किती गोड आहे.


पुढचं कडवं जरा वेगळं आहे. तेव्हा मी याचा कधी विचारच केला नव्हता. 

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील

या ओळींनी आधी मी चकीत झाले, देवाबद्दल मी काहीच कसा विचार केलेला नाही? आणि मग मला पटलं. खरंच की!

या ओळींनी माझ्या मनातला देव सुंदर केला!!

 

मी या कवितेची ऋणी आहे.


ही कविता कधीही वाचली/ ऐकली की ते जुनं 'निरागसपण' सोबत घेऊन येते. आनंद घेऊन येते.


-- विद्या कुळकर्णी

माझ्या आनंदलोकात

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून

-- कुसुमाग्रज

ही कविता माझ्या माहितीप्रमाणे प्रथम "आनंद" या नाटकात  लिहीलेली आहे.
 आनंद हे नाटक शिरवाडकरांनी " आनंद" या सिनेमावरून लिहीलेलं आहे.
 
 त्यातलं मुख्य पात्र आनंद आहे. ते आपण ओळखतोच.

या आनंद चा एक "आनंदलोक" आहे.
 त्याचं स्वतः चं जग!
आणखी एका कवितेत तो म्हणतो तसं..
 *माझी एक खाजगी पृथ्वी असते माताजी!*
  
 हा " आनंदलोक" कसा आहे?
माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही
सगळ्यात महत्त्वाचं हा "माझा" आनंदलोक आहे. :)
 इथे चंद्र मावळत नाही. 
ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही, असं होतं.
तसा हा आनंदलोक आहे, जिथे चंद्र मावळत नाही, इथे शीतलता कायम आहे. इथे दर्या जो आहे तो प्रेमाचा आहे आणि दर्यावर येणाऱ्या लाटा निर्माण करणारा चंद्र कधी मावळत नाही. या सागरात लाटा येतात , आवेग आहेत पण वादळ नाही.अविश्वास नाही.
  
 माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर
 इथे चंद्र कायम आहे, वसंत ऋतूने इथे घर केलं आहे. इथे ऋतू बदल नाहीत. वसंत हा उत्सवाचा ऋतू आहे. इथे तो चालूच आहे. आंब्याने फळ धरलं आहे आणि त्यावर बसून कोकीळा/कोकीळ गाताहेत.
  इथे काळ एका "आनंदी" बिंदूवर येऊन स्थिर झाला आहे.
 सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून
इथे सात रंग म्हणजे केवळ " रंग" नाहीत तर विविध कला, सूर, लेखन, नृत्य, गायन असं सगळं आहे, त्यांची मैफल जमलेली आहे. ती मैफल हवेतच आहे, तिचं अस्तित्व हवेसारखं ठायी ठायी आहे.
  मरण पुढ्यात आहे, तेही सुंदर आहे, ते नाचतं आहे, तेही मोहक आहे, रंगीबेरंगी आहे.
 या आनंदलोकाचा भागच आहे ते!
 आनंदलोक असा ( वर वर्णन केलं आहे तसा) का आहे?
 याचं उत्तर या शेवटच्या ओळीत आहे.
 कारण इथे मृत्यूची भीती नाही, मृत्यूचं अस्तित्व स्विकारलं आहे आणि त्याचं सौंदर्य बघण्याची दृष्टी "आनंद" मधे आहे. म्हणून त्याचा "आनंदलोक" प्रेमात न्हाऊन निघणारा आहे.
 त्याच्या आत हा आनंदलोक आहे म्हणून तो बाहेर आनंदी आहे.
  आपण आपल्या आत ज्या ग्रहावर राहतो, जी आपली आतली भूमी आहे, ती कशी आहे? तिथलं पाणी कसं आहे? तिथली हिरवळ कशी आहे? तिथलं इंद्रधनुष्य कसं आहे? यावर आपण बाहेरच्या जगात कसे असतो, हे ठरतं.
 त्यासाठी आपापला आतला प्रदेश शोधला पाहिजे, त्याची निगराणी केली पाहिजे.
 
   इथे आनंद स्वतः ची ओळख करून देतो आहे. 

 खूप सुंदर कविता

-- विद्या कुळकर्णी