Wednesday, June 15, 2011

विन्दा करंदीकर - निळा पक्षी


काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 
प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
 
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.
 
तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.
 
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
 
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.
 
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 

No comments:

Post a Comment