Saturday, December 21, 2013

पु.शि. रेगे : त्रिधा राधा

 आभाळ निळे तो हरि, 
ती एक चांदणी राधा, 
बावरी, 
युगानुयुगीची मनबाधा 

विस्तीर्ण भुई गोविंद, 
क्षेत्र साळीचे राधा, 
संसिद्ध, 
युगानुयुगीची प्रियंवदा 

जलवाहिनी निश्चल कृष्ण, 
वन झुकले काठी राधा, 
विप्रश्न, 
युगानुयुगीची चिरतंद्रा 

Tuesday, October 15, 2013

हेमंत गोविंद जोगळेकर - त्याची इच्छा

दिवसभराचे काम करुन थकल्यावरती
तुम्ही शिरू शकता तुमच्या नवर्‍याच्या कुशीत
त्याची इच्छा असेल तर,
त्याला झोप येऊन तो तुमच्याकडे पाठ करून झोपेपर्यंत.
पण त्याची इच्छा असेल
तर तुम्ही करू नका कंटाळा
कारण त्याची इच्छा असते तुम्हांला थोपटून तुमचा शीण घालवण्याची.

रात्री मध्येच तुमची छोटी उठल्यावरती
तुम्ही उठा तुमची स्वप्ने थांबवून
आणि कपडे चढवून, थोपटा तिला ती झोपेपर्यंत.
पण ती तशीच रडत राहिली
तर तिला बाहेर घेऊन जा खेळवायला;
नाहीतर तुमच्या नवर्‍याची झोपमोड होईल
कारण त्याला जायचे असते दुसर्‍या दिवशी कामावरती.

तुमच्या मोठ्याची आन्हिके, शाळा, अभ्यास
खाणेपिणे, भांडणे सोडविणे झाल्यावरती
वेळ काढून तयार करून द्या त्याला भाषण : ’माझी आई’
कारण त्याची इच्छा असते व्यासपीठावरून तुमचा गौरव करण्याची.

पाहुण्यांचे खाणे, फिरणे केल्यावरती
थोडावेळ आवर्जून बसा हसून खेळून त्यांच्याशी
कारण त्यांची इच्छा असते तुमच्याशी बोलण्याची,
तुमचे कौतुक करण्याची.
रेशन, बाजारहाट, बॅंक, सौजन्यभेटी
नवर्‍याच्या पॅंटचे तुटलेले बटण शिवणे,
त्याच्याबरोबर नटूनथटून अनोळखी पार्टीला जाणे
आणि हे सगळे करून तुम्ही मुद्दाम काढा वेळ
तुमची सतार, भरतकाम किंवा लिखाणासाठी
कारण तुमच्या नवर्‍याची इच्छा असते
तुमचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची!

Wednesday, September 11, 2013

बोरकर - पाणीच पाणी

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी


बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी


उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी


पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी


पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

Thursday, August 15, 2013

औदुंबर - बालकवी

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनि जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

- बालकवी

Saturday, August 3, 2013

हेमंत गोविंद जोगळेकर :: पहा कवितेकडे..., कवितेसाठी

पहा कवितेकडे...,  कवितेसाठी

पहा कवितेकडे
डोळॆ भरून
आपादमस्तक
एकसंध
मग पहा तिची एकेक ऒळ
एकेक शब्द
दोन शब्दांमधला
जीवघेणा अवकाश.

ऐका कवितेला
कान लावून
ऐकूही येईल
धडधड
जशी यावी दूरवरून
येणार्‍या किंवा जाणार्‍या गाडीची
विजनात पसरलेल्या समांतर रुळांमधून.

सूर मारून
पोहत जा ओळीओळीतून
किंवा ओळ मोडून
वाटलंच तर हात करा
(किंवा करूही नका)
वरच्या काठावर उभ्या शीर्षकास
किंवा खालच्या काठावर उभ्या
कवीच्या नावास.

आपसूकच करील स्पर्श
पृष्ठभागाखाली बुडलेल्या तुमच्या रंध्रारंध्रास
कवितेचे पाणी
घ्या उचलून
तुमच्या जिभेच्या शेंड्यावर
एखादा शब्द
जसा हळूच टिपावा
बाळजिभेने
साखरेचा कण.

पहा हुंगून
कवितेची टाळू
येईलही तुमच्या छातीत भरून,
जन्मजन्माइतका जुना
शेकशेगडीचा धूर.

आणि वाटलेच अगदी आतून
तर घ्या उचलून
कवितेला
तुमच्या हृदयाशी
फुटेलही कदाचित तुमच्या आतून
अर्थाचा अनावर पान्हा
कवितेसाठी




हेमंत गोविंद जोगळेकर

Tuesday, June 11, 2013

ना. धों. महानोर: वळण वाटातल्या

वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद
वाहत्या निर्झरांचे गुंतले भावबंध 

अशीच बांधलेली जन्मांची नातीगोती
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती
मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी
पीकात वेचताना पाऊस-ओल्या पोरी

तुरीच्या हारी गच्‍च, गर्भार ओटीपोटी
ज्वारीच्या ताटव्यांशी बोलती कानगोष्टी
डाळिंबी लालेलाल, रानाला डोळे मोडी
मेंदीच्या पावलांशी लागट लाडीगोडी

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येत मन
आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं
पक्षांच्या पंखांवर माहेरी रोज यावं

ना. धों. महानोर: मन चिंब पावसाळी

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । 
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ॥
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी |
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी||

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा |
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ||
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ॥


रानात एककल्ली सुनसान सांजवेळी । 
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ॥ 
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना |
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे||

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले । 
त्या राजबन्सी कोण्या डोळ्यात गुंतलेले ॥

Monday, May 13, 2013

विंदा करंदीकर -- प्रेम करावे असे, परंतू….


हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.
प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.
प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू….
प्रेम करावे हे कळल्याविण.

Monday, April 15, 2013

अरुण कोलटकर - आरसे

चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खालती एक
असे अभावाला कैद करू पाहणारे
आरसे.

"आम्ही आहोत, आम्ही आहोत"
असे ते आक्रोशले
पण अभाव त्यांच्या पुढून
अभाव त्यांच्या मागून
अभाव त्यांच्या भोवतालून
व अभाव त्यांच्यामधून
खदखदा हसला.

आरसे वेडे झाले.
आरसे भेदरले.
स्वतःच्या अस्तित्वाविषयी
त्यांना भ्रांत पडली.

आणि
आरशांनी आत्महत्या केली.

Wednesday, March 6, 2013

बोरकर : इतुक्या लौकर येइं न मरणा

इतुक्या लौकर येइं मरणा
मज अनुभवुं दे या सुखक्षणां!

फिरुन पहाटे डोंगरमाथा
घ्यावे काजू येतिल हाता
किंवा पोफळी शिंपुनि दमतां
मज आलिंगू दे रविकिरणां

वझर्‍यावरती न्हाउनि पाणी
गावी मी कुणबाऊ गाणी
पोवलींतुनी पेज पिऊनी
झोपुनी जरा सुखवुं दे मना
निसर्ग गो-वत्सांशि रमावें
दिवसभरी श्रम करित रहावें
मासळीचा सेवित स्वाद दुणा

पडत्या किंवा सायंकाळी
गुंतावे भावांच्या जाळी
वेणुस्वरांची काढीत आळी
मज उकलूं दे आंतील खुणा

रेंदेराचे ऐकत गान
भानहीन मज मोडुनि मान
चुडताच्या शेजेवर पडुन
भोगुं दे मूक निस्तब्धपणा

रात्री समईशी वाचावी
ज्ञानोबाची अमृत-ओवी
कविता-स्नेहें वात जळावी
उजळीत मनाचा द्वैतपणा

कुळागराची गर्द साउली
त्यांतच माझी खोप सानुली
निद्रेविण स्वप्नांच्या ओळी
रेखीत भोगु दे सरळपणा

फूलपांखरे अनंत माझी
बनुनी, मी सेवावी ताजीं
हृत्सुमनें आनंदामाजीं
नाचवीत पांथांच्या नयनां

Monday, February 25, 2013

एकमेक - कविता महाजन


थोडावेळ बसू एकमेकांसोबत शांत
एकमेकांविषयी काही न बोलता.

मी सांगणार नाही की आजकाल
वाटतंय मरून जाईन रात्री झोपेतच.
स्वप्न पाहता-पाहता मरून गेलेलं माणूस
मेल्यावर कुठं जातं, हेही विचारणार नाही तुला.

तूही सांगणार नाहीस की
बाकी सारं कंटीन्यू होईलच पुढच्या जन्मात
जसं गेल्या जन्मीचं झालं या जन्मी
आणि प्रत्येक जन्मात आपल्याला
समजतेय एकमेकांची भाषा.

अजून काय हवंय आता
एका लहानशा निळ्या पूर्णविरामाखेरीज?