Saturday, July 16, 2011

आबाद - वसंत बापट

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून

2 comments:

  1. हं..
    आपल्या जगण्याचंच गाणं की हे..

    बापटांनी हे लिहिल्यानंतर आपण एवढी प्रगती केली आहे की आता कुठे काही सलतच नाही.
    डोळयांच्या बाहुल्या निष्प्राण कोरड्याच राह्तात कितीही जखमा झाल्या तरी; पाण्याची धाव कुठपर्यंत ते मोजायचा सवालच नाही.

    ReplyDelete
  2. >>
    कोण उगाच मरते तेव्हा
    आरडाओरड होते दुरून
    <<
    जळजळीत वास्तव! मस्तक चिरून गेलेली ती गोळी बापटांना किती आधीच दिसली होती...

    - सचिन

    ReplyDelete