Wednesday, November 4, 2015

मन - मेघा देशपांडे

मन

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरे

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ

- मेघा देशपांडे

7 comments:

  1. देह चुलीपाशी रत
    मन फिरे रानोमाळ
    देही हिशेब नेटका
    मनी कवितेची ओळ

    ReplyDelete
  2. ही कविता मेघा देशपांडे यांची आहे. बहिणाबाईंची नाही. कृपया दुरूस्ती करावी. अन्यथा हा चोरलोल्या कवितांचा गाव आहे असे खेदाने म्हणावे लागेल

    ReplyDelete
  3. कवयित्रिचं नाव कळवल्याबद्दल धन्यवाद! दुरूस्ती केली आहे. कवयित्रीचे नाव चूकीचे नमूद केल्याबद्दल क्षमस्व. बहिणाबाईंच्या नावाने दिलेल्या या कवितेला चोरीची कविता असे कृपया संबोधू नये.

    ReplyDelete
  4. धन्यवाद!

    माझे शब्द मागे घेतो. माझ्या प्रतिक्रियेमागची भावना लक्षात घ्यावी ही विनंती.

    कवितांचा गाव चिरायू होवो :)

    ReplyDelete
  5. काय लिहावे कळत नाही! फार छान आहे. नकळतच बहिण बाईंच्या ओळी आठवल्या. 👌

    ReplyDelete