Sunday, November 27, 2011

कविता महाजन -- कोण ऐकतं हाक?



कोण ऐकतं हाक?
एक चांदणी जेव्हा हाक मारते
घुसमटल्या आवाजात जीवाच्या आकांताने
तेव्हा ना काळोख ऐकतो
ना उजेड

पाहत राहतात जागणारे सारे
न ऐकता
त्यांनी ऐकलंय पिढ्यानुपिढ्या
की कोसळणार्‍या चांदणीकडे पाहून
डोळे मिटायचे आणि तिला
आपली इच्छा सांगायची...
कोसळणारी चांदणी
इच्छापूर्ती करणारी असते.

चांदणी दगड होते कोसळताना
सारं तेज लोप पावतं तिचं
जिथे कोसळते तिथे एक
विवर जन्मतं पृथ्वीवर.
विवरातल्या पाण्यात दिसत राहतात
अगणित चांदण्यांची प्रतिबिंबं.

कोण ऐकतं हाक ! ?

Thursday, November 3, 2011

सर्व सर्व विसरु दे - मंगेश पाडगांवकर

सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा

हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा

रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचांदणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा

हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा

हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना

Friday, October 14, 2011

शांता शेळके : शब्द

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

Sunday, September 25, 2011

कुसुमाग्रज: चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले

(वीज म्हणाली धरतीला)

Wednesday, August 17, 2011

आरती प्रभू - निकामी

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा 
सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी 

दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा

Saturday, August 13, 2011

अरुणा ढेरे : हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा

Tuesday, July 26, 2011

गुलज़ार : किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से

किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से
बड़ी हसरत से तकती है
महीनों अब मुलाकाते नही होती
जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर
गुजर जाती है कंप्युटर के परदों पर
बड़ी बेचैन रहती है किताबे ....
इन्हे अब नींद में चलने की आदत हो गई है
बड़ी हसरत से तकती है ..

जो कदरें वो सुनाती थी
की जिन के सैल कभी मरते थे
वो कदरें अब नज़र आती नही घर में
जो रिश्ते वो सुनाती थी
वह सारे उधडे उधडे हैं
कोई सफहा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है
कई लफ्जों के माने गिर पड़े हैं
बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं वो सब अल्फाज़
जिन पर अब कोई माने नही उगते
बहुत सी इसतलाहें हैं
जो मिटटी के सिकूरों की तरह बिखरी पड़ी है
गिलासों ने उन्हें मतरुक कर डाला

जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
बहुत कुछ तह बा तह खुलता चला जाता है परदे पर
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है
कभी सीने पर रख कर लेट जाते थे
कभी गोदी में लेते थे
कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बना कर
नीम सजदे में पढ़ा करते थे ,छुते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी
मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने ,गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे !!

Saturday, July 16, 2011

आबाद - वसंत बापट

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून

Friday, July 15, 2011

बालकवी - श्रावणमासी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

ग्रेस - पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

बा. भ. बोरकर - क्षितिजी आले भरते गं

क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं !
लाजण झाली धरती गं
साजण काठावरती गं
उन्हात पान
मनात गान
ओलावून थरथरते गं !
नाते अपुले न्हाते गं
होऊन ऋतूरस गाते गं
तृणात मोती
जळात ज्योती
लावीत आले परते गं !

Thursday, July 14, 2011

कैफ़ात भावनांच्या ..

गुर्मी कशास वदता
उर्मी असे मनाची;
कैफ़ात भावनांच्या
मी गातसे स्वत:शी ।

मी कोण कोठला ही
नव्हतीच जाण जेव्हा;
हुंकार देत होतो
गाण्यातुनी मनाशी ।

भरल्या दवातुनी मी
शोधीत अश्रू होतो;
वेडा म्हणून ठरलो
व्यवहारी या जगाशी ।

जखमा कधी न जपल्या
भरल्या जरी न होत्या;
अंकूर भावनांचे
जोपासले मनी मी ।

अंगारल्या कणांचा
भलताच षौक केला;
परी शोक नाही केला
मी भाजलो म्हणुनी ।

तारूण्य ऐहिकांचे
आम्ही न भोगियेले;
विद्युल्लतेस आम्ही
शैयेस बोलाविले ।

आक्रोश कावळ्यांनो
आता कशा फ़ुकाचा;
हा कारवाँ निघाला
घरटी बसा धरोनी ।

- अ. रा. कुलकर्णी

Wednesday, July 13, 2011

नदीकाठची झाडी...

पिकलेल्या लिंबाहून पिवळे
गवतावरती ऊन
या वार्‍याने झाडे झाली
हिरवी हिरवी धून

मातीच्या मौनावर फिरली
हळवी केशरकाडी
फुलपंखी स्वप्नांची झाली
नदीकाठची झाडी

- मंगेश पाडगावकर

रात्रीं झडलेल्या धारांची

रात्रीं झडलेल्या धारांची

ओल अजून हि अंधारावर

निजेंत अजुनी खांब विजेचा

भुरकी गुंगी अन तारांवर

भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या

वळचणींत मिणमिणे चांदणी

मळक्या कांचेवरी धुक्याच्या

वाऱ्याची उमटली पापणी

कौलावरुनी थेंब ओघळे

हळुच, सांचल्या पाण्यावरतीं;

थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो

गिरकी घेऊन टांचेवरतीं

गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच

गुरफटलेली अजुन स्तब्धता

कबूतराच्या पंखापरि अन

राखी…कबरी ही अंधुकता

अजून आहे रात्र थोडिशी,

असेल अधिकहि…कुणि सांगावें?

अर्धी जाग नि अर्धी निद्रा

इथेंच अल्गद असें तरावें!

- मंगेश पाडगांवकर

Sunday, July 10, 2011

प्रभा गणोरकर

माणसाला माणूस दिसत नाही
अशी गडद संध्याकाळ
जवळपास रात्रच
पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली
पायाखालची वाट दिसत जाते
रस्त्यावर दिवे नसतानाही
पायांना सापडत जाते
जुन्या घराचे सारवलेले अंगण
वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या
दरवाजाचा काळा मखमली स्पर्श
वेचीत माझे हात दार ढकलतात
साखळी वाजते
आतून हळू आवाज येतो
आलीस बाई, ये.

बा. भ. बोरकर: खूप या वाड्यास दारे

खूप या वाड्यास दारे, एक याया कैक जाया
दो घडी येतात तेही लावुनी जातात माया

पाखरांची मुक्त मांदी गात ये आल्हाद नांदी
अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी

गोठणीसाठी गुरांची सावलीशी गर्द दाटी
कोण मायेने कुणाशी पाठ घाशी, अंग चाटी

पंढरीचा पांथ दारी गोड छेडी एकतारी
साधते त्याच्या अभंगे बैसल्या जागीच वारी

कावळा सांगून जातो पाहुणा येणार आहे
त्यामुळे घासात माझ्या अमृताची धार वाहे

आणखी रात्री, पहाटे चांदणे शेजेस येते
अन् फुली वेढून मातें स्वप्निच्या राज्यात नेते

आप्त सारे भेट घेती जे तिथे वस्तीस गेले
सांगतो मी त्यास किस्से पाहिलेले ऐकिलेले

मी खरा तेथील वासी हा न वाडा ही सराई
पाहुणा येथे जरी मी जायची मातें न घाई

Thursday, July 7, 2011

पुस्तकांतली खूण कराया

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.
मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.

इंदीरा संत.

Monday, July 4, 2011

----- सौमित्र (किशोर कदम)

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे.

नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे.

उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे

असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
रुतून रुतुनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे,

मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता पावलेही दुखू लागले की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे.

फिर कही कोई फुल खिला....

फिर कही कोई फुल खिला, चाहत ना कहो उसको
फिर कही कोई दिप जला, मंझिल ना कहो उसको

मन का समंदर प्यासा रहा,
क्यु किसिसे मांगे दुवा
लहरोका चला जो मेला
तुफा ना कहो उसको

फिर कही कोई फुल खिला, चाहत ना कहो उसको
फिर कही कोई दिप जला, मंझिल ना कहो उसको

देखे सब वो सपने
खुद ही सजाये जो हमने
दिल उनसे बहेल जाये तो
राहत ना कहो उसको

फिर कही कोई फुल खिला, चाहत ना कहो उसको
फिर कही कोई दिप जला, मंझिल ना कहो उसको

- गुलझार (चित्रपट - अनुभव)

मला माहिती नाही की याला कविता म्हणावं की नाही.

कुसुमाग्रज : निवास

खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारव्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी

कुसुमाग्रज : मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधू का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपू का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांचं तुफान उठलं.

Friday, July 1, 2011

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला
हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

आरती प्रभू
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

आरती प्रभू

Monday, June 27, 2011

बा. भ. बोरकर - झाड गूढ


झाड गूढ झाड गूढ
ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी
स्वप्नरंगांचे गारूड
 
झाड पाताळ फोडते
झाड आकाश वेढते
ताळ मूळ संसाराचे
गाठीगाठीत जोडते
 
झाड वाकडे तिकडे
छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटीबा
वारी मेघांचे साकडे
 
झाड स्वछंदी आनंदी
सुखे होय जायबंदी
घावाघावातून धाडी
फुले ज्वाळांची जास्वंदी
 
झाड माझे वेडेपिसे
उन्ही जळताना हसे
रूसे धो धो पावसात
चांदण्यात मुसमुसे
 
वेडे झोपेत चालते
अर्ध्या स्वप्नात बोलते
गिळोनिया जागेपण
उभे आहे तो वाढते

Saturday, June 25, 2011

बा. भ. बोरकर - तव नयनाचे दल हलले ग !


तव नयनाचे दल हलले ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
         त्रिभुवन हे डळमळले ग !
 
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
         ऋषि, मुनि, योगी चळले ग !
 
ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर आपुले भाले
          मीन जळि तळमळले ग !"
 
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
          पुनरपि जग सावरले ग !

Thursday, June 23, 2011

पु.शि.रेगे : पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषांतुन पाझरलें,
निळ्या लाघवी दंवांत उलगडलें,
जें मोरपिसांवर सांवरलें,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हा एकदां
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये - डॊळ्यांपाशी -
झनन-झांजरे मी पाहिलें...
पाहिले न पाहिले.

जें प्राजक्ताच्या पाकळिवर उतरले,
मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेंसावर महिरपलें,
जे जललहरीवर थरथरले,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या
ओठांवरती - ओठांपाशी
ठिबक-ठाकडें मी पाहिलें....
पाहिलें न पाहिलें.

जे कलहंसांच्या पंखांवर भुरभुरलें,
सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतुन शहारलें,
जें पुनवेंच्या चांदण्यांत भिजलें, भिजलें,
ते - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या

मानेखालीं - किंचित वक्षीं -
बहर-बावरें मीं पाहिलें...
पाहिलें न पाहिलें.

Wednesday, June 15, 2011

बा. भ. बोरकर -- निळा


एक हिवतीचा निळा एक धुवतीचा निळा
दूर डोंगरातला एक जरा त्याच्याहून निळा
 
मोरपिसाच्या डोळ्यातला एक मखमली निळा
इंद्रनिळातला एक गोड राजबिंड निळा
 
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
 
असे नाना गुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्यनवे गडे तुझे माझे डोळे
 
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा
 
आपणही होऊ निळ्या करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग

विन्दा करंदीकर - निळा पक्षी


काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 
प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
 
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.
 
तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.
 
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
 
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.
 
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
 

Thursday, June 9, 2011

बा. भ. बोरकर - सरिवर सरी आल्या ग


सरिवर सरी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कांपति निंब-कदंब
घनांमनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवि चाळ अनंग
पाने पिटती टाळ्या ग
सरिवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदीं थिजून
घुमतो पांवा सांग कुठून?
कृष्ण कसा उमटे न अजून?
वेली ऋतुमति झाल्या ग
सरिवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग
गोपि दुधाच्या धारा ग
दुधांत गोकुळ जाय बुडून
अजून आहे कृष्ण दडून
मी-तूं-पण सारें विसरून
आपणही जाऊं मिसळून
सरिवर सरी आल्या ग
दुधांत न्हाणुनि धाल्या ग
सरिवर सरी : सरिवर सरी....

बा. भ. बोरकर - हवा पावसाळी


हवा पावसाळी जरा रात्र काळी
ढगाआडचा चंद्र थोडा फिका
दिवे दूर काही धुक्याच्या प्रवाही
जळी पूल कोणी लुळा मोडका
कुठे दाट खोपी उभे माड झोपी
पथी झावळांच्या खुळ्या सावळ्या
कुठे सर्द वारा जरा गर्द खारा
जीवा स्पर्शुनी त्याही भांबावल्या
कुणी बांग देतो कुणी वेध घेतो
अकस्मात तेजाळती काजवे
सुखाच्या तळाशी किती दु:खराशी
उरी कारणाविणही कालवे
नदी आज जागी उदासी अभागी
अजुनी न ये नीज या सागरा
हवा पावसाळी जरा रात्र काळी
हिची आगळी आज काही तर्‍हा

Saturday, May 14, 2011

अनुराधा पोतदार : एक पुरुष हवा आहे.

एक पुरुष हवा आहे.
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारुन जाणारा,
केसातून बोटे फिरली की बाळ होऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरुष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

नाही..
हे मी म्हणत नाहीये,
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून

Tuesday, April 12, 2011

लोकगीत -- सरलं दळण


सरलं दळण
माही भरली ओंजळ
सोन्याची तुळस
वर मोत्याची मंजूळ

सरलं दळण
मी ते आनिक घेणार
देवा विठ्ठ्लाची
मले पालखी येणार

जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
शेवटला भास
मन फिरते आकाशी

गेला माहा जीव
मले भीतीशी कुटवा
सोन्याचं पिंपळपान
माह्या माहेरी पाठवा

गेला माहा जीव
राया रडे खळाखळा
लग्नाचा जोडा
न्हाई मिळत येळोयेळा

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

गेला माहा जीव
माह्या किरडीले साकळ्या
दिर लावी ओझा खांदे
राम चालू द्या मोकळा

Sunday, April 10, 2011

बी. रघुनाथ - चंदनाच्या विठोबाची


चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

Friday, April 8, 2011

कुसुमाग्रज - थेंब

महासागराचं चरित्र
मला माहीत आहे
माहीत आहे त्याची महतीही,
पण मी राहतो आहे
फुलाच्या पाकळीवर
अवकाशातून उतरलेल्या
दहिवराच्या
एका लहानशा थेंबामध्ये;
मला माहीत आहे हेही
की जगातील सार्‍या थेंबांवर
अंतिम मालकी आहे
महासागराची,
आणि तरीही माझी बांधीलकी
पृथ्वीला वेढणार्‍या
त्या सीमाहीन महातत्त्वाशी नाही,
ती आहे --
माझ्याच अस्तित्वाने ओथंबलेल्या
स्फटिकाच्या या थेंबाशी;
कारण -- माझी बांधीलकी
ज्ञानाची नाही
आहे फक्त प्रेमाची.


कुसुमाग्रज : खेळ

आणि लक्षात ठेव
हा एक खेळ आहे
खेळाच्याच नियमांनी
बांधलेला
निर्मळ बिलोरी आनंदात
सांधलेला
आघात करायचा
पण रक्‍त काढायचं नाही
जीव ओतायचा
पण जीवन हरपायचं नाही
विसर्जित व्हायचं
पण स्वत्व गमवायचं नाही

आणि आपल्या अंतरंगातील पंच
तटस्थ समयसूज्ञ साक्षी
थांबा म्हणतील त्या क्षणी थांबायचं
आणि जवळ जमलेले
-- चंद्राचे तुकडे घेउन
-- आपापल्या अंधारात
विलीन व्हायचं

Monday, April 4, 2011

ग्रेस - निळाई

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ 
निळ्या अस्तकालीन नारायणा?

निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...


किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे...


Wednesday, March 23, 2011

आरती प्रभू : आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे

Sunday, February 27, 2011

सुरेश भट - लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी


   लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
   जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
   धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
   एवढ्या जगात माय मानतो मराठी
            आमुच्या मनामनांत दंगते मराठी
          आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी
          आमुच्या नसानसांत नाचते मराठी
          आमुच्या रगारगांत रंगते मराठी
   आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
   आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
   आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
   आमुच्या घराघरांत वाढते मराठी
           आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी
           येथल्या फुलाफुलांत हासते मराठी
           येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
           येथल्या नगानगांत गर्जते मराठी
     येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
     येथल्या वनावनांत गुंजते मराठी
     येथल्या तरूलतांत साजते मराठी
     येथल्या  कळीकळींत लाजते मराठी
          येथल्या नभामधून वर्षते मराठी
          येथल्या पिकामधून डोलते मराठी
          येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
          येथल्या चराचरांत राहते मराठी
     पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
      आपुल्या घरात हाल सोसते मराठी
      हे असे कितीक खेळ पाहते मराठी
      शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कुसुमाग्रज - आम्ही


                                 जे मला जाणवतं
                                  तेच खरं आहे,
                                  जे मला सुखावतं
                                  तेच बरं आहे.
                                  हे तुझं सांगणं
                                  "मी" ला सार्वभौम मानणारं
                                  मलाही पटतं.
                                  पण लक्षावधी संबंधांनी 
                                  माणसातला मी जेंव्हा 
                                  दशदिशा पसरतो,
                                  तेंव्हा आपले रस्ते बदलतात.
                                  कारण मी चं रुपांतर
                                  "आम्ही" त झालेलं असतं.

कुसुमाग्रज - येणं जाणं


आल्या आल्या म्हणतेस, आता
पुन्हा कधी जाणार नाही,
जाता जाता म्हणतेस, आता
पुन्हा कधी येणार नाही.
      येणं जाणं कुणास ठाऊक
      घडेल कसं
      वार्‍यावरती तरंगणारी
      सारीच पिसं
नसतानाही भरपूर असतेस
एव्हढंच तुला कळणार नाही


कुसुमाग्रज - संस्कृती


अखेरत:
संस्कृती म्हणजे
माझ्या मनाचं सामर्थ्य
जे अपार आहे
त्याला किनारा घालण्याचं.
विश्वात्मक ईश्वरतेला
मंदिराचा... मूर्तीचा...
मृत्यूच्या अतीर सागराला
मोक्षाचा... भक्तीचा...
प्रेमाच्या मुक्त उर्मीला
नात्याचा... सक्तीचा...
ही संस्कृती
मला तारते आहे
मारतेही आहे.

Friday, February 25, 2011

ग्रेस : ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि:संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

पद्मा गोळे : पाठीशी कृष्ण हवा !

मौनानं ही होतं एवढं रामायण
हे माहीत असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते ;
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक, पोटात भलतंच
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन;
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा.

Friday, February 11, 2011

पद्मा गोळे : जाणीव


अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

--- पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा
समुद्र केव्हा वादळतात;
काळेकुट्ट ढग येतात;
वादळवारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात --
असे... असे बरसतात की
खुजेपणा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !

-- त्या क्षणाच्या आठवणींवर
खुजा जीव जगू पहातो;
क्षणभर थोड उंच होऊन
पाऊल थोडं पुढं टाकतो !

Sunday, February 6, 2011

अभिजित कदम : बिचारी

हेडमास्तरांनी
काल दहावीतली मुलगी
स्वयंपाकासाठी घरी नेली
बिचारीची पहिलीच भाकरी जळून गेली.

Friday, January 28, 2011

पद्मा गोळे : आठवणी

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच...
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे --
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे --
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे --

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी -- सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
-- पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी

Saturday, January 22, 2011

वसंत बापट: जॅकरांडा


जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !

उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !


कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !

हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !

इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !

जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !

Tuesday, January 18, 2011

पद्मा गोळे : लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !

Wednesday, January 12, 2011

मर्ढेकर - पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

Tuesday, January 11, 2011

विंदा करंदीकर - ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.

Friday, January 7, 2011

ग्रेस - दुःख घराला आले

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
 
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे

Thursday, January 6, 2011

पद्मा गोळे : वाटा

वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !